Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
करूळ घाटात बंद पडलेल्या ट्रेलरला एसटीची धडक

करूळ घाटात बंद पडलेल्या ट्रेलरला एसटीची धडक

अपघातात चालकासह चौघे किरकोळ जखमी

वैभववाडी प्रतिनिधी :

करूळ घाटात अवघड वळणावर बंद पडलेल्या ट्रेलरला देवगड-पुणे एसटीची धडक बसून अपघात झाला. ही घटना शनिवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली.

या अपघातात एसटी चालक व वाहकासह तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी झाले. याबाबत वाहक अभिजीत एकनाथ वरुटे रा.देवगड आगार यांनी वैभववाडी पोलिसात तक्रार दिली असून चालक परमानंद दत्तू मेश्राम रा. देवगड आगार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवगड आगारातून सायंकाळी साडेपाच वाजता पुण्याकडे निघालेल्या एसटी बसमध्ये सुमारे ३० प्रवासी होते. करूळ चेकपोस्टपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर अवघड वळणावर दोन दिवसांपासून ट्रेलर बंद अवस्थेत उभा होता. या ठिकाणी एसटी चालक परमानंद दत्तू मेश्राम यांचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसची ट्रेलरला मागून धडक झाली.धडकेत चालक मेश्राम, वाहक अभिजीत एकनाथ वरुटे तसेच तीन ते चार प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिस ठाण्याचे हवालदार हरीश जायभाय व राहुल तळसकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पंचनामा करून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी चालक परमानंद मेश्राम यांच्याविरुद्ध रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वैभववाडी पोलिस करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital