Dailyhunt
खेर्डी वस्तीचे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न

खेर्डी वस्तीचे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण नगरातील खेर्डी वस्तीमध्ये रविवार दि. ५ एप्रिल रोजी हिंदू संमेलनाचे आयोजन सकल हिंदू समाज खेर्डी यांचे मार्फत माळेवाडी येथील दत्त मंदिरात उत्साहात संपन्न झाले.

संघशताब्दी निमित्ताने हिंदू संमेलनाचे आयोजन चिपळूण नगरामध्ये आठवस्त्यांमध्ये करण्याचे नियोजित आहे.
या नियोजनाप्रमाणे खेर्डी वस्तीपासून या हिंदू संमेलनाची सुरूवात झालेली आहे. या हिंदू संमेलनाच्या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रकाश गगनग्रास एक्सल इंडस्ट्रीजचे माजी व्यवस्थापक, श्री ह. भ.प. लक्ष्मण बुवा चिले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे वक्ते श्री निलेश भास्कर, कोकण प्रांत सहसंपर्कप्रमुख म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वारकरी संप्रदायातील मंडळींनी दिंडी काढून केली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात गोमाता पूजन करण्यात आले. संत गोरा कुंभार विकास मंडळ खेर्डीचे संस्कार व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी रामरक्षेचे पठण केले तर शिगवणवाडी शाळेतील विद्यार्थिनींनी श्री शिवछत्रपतींच्या पाळणा आणि कुमारी मिस्त्री हिने रामनामाचे गीत सादरीकरण केले.
यावेळी प्रमुख वक्ते निलेश भास्कर यांनी हिंदू संमेलन याची आवश्यकता, महत्त्व विशद केले. सकल हिंदूंनी आपले मतभेद विसरून एकत्र येऊन राष्ट्राला परमवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, नागरिक शिष्टाचार, स्वची ओळख आणि कुटुंब प्रबोधन यावर भाष्य केले. आपली कुटुंब पद्धती, आपल्या रूढी परंपरा, आपली गौरवशाली इतिहास याचे जतन, संवर्धन आणि रक्षण करणे हे आपली जबाबदारी आहे. प्रत्येक हिंदूने आपल्या संस्कृतीचे रक्षण करणे हे आद्य कर्तव्य आहे असे मत व्यक्त केले. यानंतर सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील खेडेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खेर्डी वस्तीतील ग्रामस्थ बंधू भगिनी, कार्यकर्ते यांनी अपार मेहनत घेतली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital