रत्नागिरी : येथील कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात आणि लोकशाही मार्गाने पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने याचे आयोजन केल्याची माहिती मुख्याध्यापिका सौ.
प्राजक्ता कदम यांनी दिली.
इयत्ता चौथीतील विद्यार्थी उमेदवार होते. उमेदवारांनी प्रत्यक्ष निवडणूक लढवताना प्रत्येक वर्गात जाऊन जोरदार प्रचार केला. 'मला मत का द्यावे' हे पटवून देत मतदारांना आकर्षित केले. शाळेत प्रत्यक्ष निवडणुकीसारखेच हुबेहूब वातावरण तयार करण्यात आले होते. संगणक कक्षात मतदान केंद्रे तयार करण्यात आली होती.
यामध्ये मतदान अधिकारी, मतपेटी आणि मतदारांच्या बोटाला शाई लावण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी रांगेत उभे राहून अत्यंत शिस्तीत आपले अमूल्य मत नोंदवले. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतमोजणी करण्यात आली. सर्वाधिक मते मिळवणाऱ्या उमेदवारांची शालेय मंत्रिमंडळात 'मंत्री' म्हणून निवड करण्यात आली. मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित मंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली, तेव्हा संपूर्ण शाळेत टाळ्यांचा कडकडाट झाला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव मिळाला आणि बालवयातच लोकशाहीच्या कर्तव्याची ओळख झाली, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले. निवडणूक प्रक्रियेसाठी मंजिरी गुणे, प्रेरणा नागवेकर, मनस्वी तांदळे, अक्षता बिर्जे यांनी विशेष साहाय्य केले. गीता सावंत, सुधीर शिंदे, सोमनाथ दुकले, प्रीती देवरुखकर, माधव राठोड आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

