Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कुवळेत नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम

कुवळेत नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम

शेतकऱ्यांच्या सहभागातून जैविक निविष्ठा निर्मितीचे प्रात्यक्षिक

शिरगांव (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील कुवळे येथे सोमवारी नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीतील विविध तंत्रज्ञानाची माहिती देतानाच जैविक निविष्ठा घरच्या घरी तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

या प्रशिक्षणामध्ये बिजामृत, घनजीवामृत, द्रवजीवामृत आणि दशपर्णी अर्क प्रत्येकी २०० लिटर तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या जैविक निविष्ठांचा पिकांमध्ये योग्य पद्धतीने वापर कसा करावा, याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जैविक निविष्ठा घरच्या घरी तयार करून रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापरास आळा घालावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले. तसेच या निविष्ठा स्वतः तयार केल्यास उत्पादन खर्चात बचत होण्यास मदत होते, याचे महत्त्व पटवून देण्यात आले.

यावेळी कार्डशीट व बटाटा ग्रीसच्या साहाय्याने शेतकऱ्यांकडून चिकट सापळे तयार करून घेण्यात आले. तसेच भात प्रक्षेत्रावर पक्षी थांबे व कामगंध सापळे लावण्यात आले. नैसर्गिक शेतीत निंबोळी अर्क तयार करण्यासाठी उपयुक्त असलेल्या कडुनिंबाच्या रोपाची लागवडही करण्यात आली.

या प्रशिक्षण कार्यक्रमास कुवळे गावचे सरपंच सुभाष कदम, कृषी विज्ञान केंद्र, किर्लोसचे डॉ. विलास सावंत, उपविभागीय कृषी अधिकारी, कणकवली उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी, देवगड श्रीमती आरती पाटील, मंडळ कृषी अधिकारी, शिरगांव डॉ. बी. एम. लांबाडे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, देवगड निकेतन राणे, सहाय्यक कृषी अधिकारी सचिन पडघन, सहाय्यक कृषी अधिकारी अमोल इढोळे, नैसर्गिक शेती शाळा संपर्क शेतकरी अजितकुमार घाडी यांच्यासह महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital