Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
क्वीन्सलंड विद्यापीठाच्या विशेष आंतरराष्ट्रीय स्नेहमेळाव्यात सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षांची मान्यवर उपस्थिती

क्वीन्सलंड विद्यापीठाच्या विशेष आंतरराष्ट्रीय स्नेहमेळाव्यात सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षांची मान्यवर उपस्थिती

चिपळूण (प्रतिनिधी) : ऑस्ट्रेलियातील जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलंड तर्फे आयोजित विशेष आंतरराष्ट्रीय स्नेहमेळाव्यात सह्याद्री शिक्षण संस्थाचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध शेखर निकम यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून संस्थेचा गौरव वाढविला.

नवी दिल्ली येथील द इम्पेरियल हॉटेल येथे मंगळवार, दि. २६ मे रोजी हा विशेष स्नेहमेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलंडचे माजी विद्यार्थी, भारतातील विविध सहयोगी शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ तसेच आंतरराष्ट्रीय शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित मान्यवर सहभागी झाले होते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शैक्षणिक, संशोधन व तांत्रिक सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कृषी व अन्न विज्ञान, वैद्यकीय जैवविज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, पशुवैद्यकशास्त्र, जैवतंत्रज्ञान तसेच संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी जागतिक स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलंड च्या या विशेष कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलपती प्रा. पीटर व्हर्गीज, कुलगुरू प्रा. डेबोराह टेरी, जागतिक भागीदारी विभागाचे प्रो-व्हाइस चान्सलर प्रा. ब्रेट लव्हग्रोव्ह, इन्स्टिट्यूट संचालक प्रा. मॅथ्यू मोरेल तसेच विज्ञान विद्याशाखेच्या कार्यकारी अधिष्ठाता प्रा. मेलिसा ब्राउन हे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी भारतातील शैक्षणिक संस्थांशी असलेले सहकार्य, संशोधन क्षेत्रातील वाढत्या संधी तसेच जागतिक शिक्षणातील नव्या प्रवाहांबाबत मार्गदर्शन केले. जुलै २०२४ मधील मास्टर ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्स (UQ Gatton Campus) बॅचचे माजी विद्यार्थी असलेले सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम यांना या विशेष स्नेहमेळाव्यास विशेष निमंत्रित म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सह्याद्री शिक्षण संस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांमुळे त्यांची उपस्थिती विशेष महत्त्वाची ठरली. कार्यक्रमादरम्यान श्री. अनिरुद्ध निकम यांनी युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलंडच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी शिक्षण क्षेत्रातील आधुनिक संकल्पना, संशोधन विकास, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य, विद्यार्थी व प्राध्यापक देवाणघेवाण कार्यक्रम, कृषी शिक्षणातील नवतंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान संशोधन तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणाऱ्या जागतिक शैक्षणिक संधींबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण कोकणातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे शैक्षणिक, तांत्रिक व कौशल्यविकास उपक्रम, आधुनिक प्रयोगशाळा सुविधा, संशोधनाभिमुख शिक्षणपद्धती तसेच विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील शिक्षणाशी जोडण्याचे संस्थेचे प्रयत्न यांची माहिती मान्यवरांना दिली. ग्रामीण पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण व संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यात संयुक्त उपक्रम राबविण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
श्री. निकम यांनी यावेळी भारतीय विद्यार्थ्यांची संशोधनक्षमता, कृषी क्षेत्रातील नवोन्मेषी कल्पना तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेली गुणवत्ता यावर विशेष भर दिला. जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्थांशी सहकार्य वाढल्यास ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी संशोधन, उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या विशेष स्नेहमेळाव्यामुळे सह्याद्री शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून संस्था, विद्यार्थी, शिक्षक तसेच संपूर्ण कोकण परिसरासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब मानली जात आहे. सह्याद्री शिक्षण संस्था भविष्यातही जागतिक शिक्षणसंस्थांशी सहकार्य वाढवत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital