लांजा (प्रतिनिधी ) :न्यू इंग्लिश स्कूल लांजा मध्ये झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत पायल अरुण भितळे हिने प्रथम क्रमांक पटकावला.
न्यू इंग्लिश स्कूल व तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, लांजा येथे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास प्रशालेचे उपमुख्याध्यापक मंगेश वाघाटे, पर्यवेक्षक रविंद्र वासुरकर, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख हणमंत सरवळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी हणमंत सरवळे यांनी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा आपल्या जीवनात अंगीकार करून राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यनिष्ठा जोपासावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत एकूण १४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून, कुमारी पायल अरुण भितळे हिने प्रथम क्रमांक, कुमारी भक्ती सुनील खडपकर हिने द्वितीय क्रमांक, तर कुमारी सान्वी सचिन यादव हिने तृतीय क्रमांक पटकाविला. या कार्यक्रमाचे नियोजन विभाग प्रमुख वर्षा तेंडुलकर यांनी केले असून आभार सहाय्यक शिक्षक रामचंद्र भातडे यांनी व्यक्त केले.

