संतोष कोत्रेलांजा-: अंजनारी येथे ट्रक जळून भस्मसात होण्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री लांजा आसगे तळवडे दाभोळे मार्गावर पुन्हा एकदा बर्निंग कारचा थरार अनुभवास आला. धावत्या टोयोटा कारला अचानक आग लागून त्यामध्ये ही कार पूर्णपणे जळून भस्मसात झाली.
सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत वेळेत वाहनातून बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, धनंजय गोपाळ केतकर (वय ६३, रा. मार्लेश्वर फाटा, देवरुख, ता. संगमेश्वर) हे त्यांच्या टोयोटा कार (एमएच ०१ एफबी ३७७४) मधून मंगळवारी रात्री लांजाहून देवरुखकडे जात होते. रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास तळवडे फाट्यानजीक पोहोचताच वाहनातून अचानक मोठा आवाज येऊ लागला आणि धूर निघू लागला. धोका लक्षात येताच त्यांनी तत्काळ वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून बाहेर पडत स्वतःचा बचाव केला. काही क्षणांतच कारने पेट घेतला आणि आगीने भीषण स्वरूप धारण केले. हा हा म्हणता कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार उर्मिला शेडे तसेच पोलीस शिपाई स्वप्निल कदम आणि उमाजी बजागे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदतकार्य सुरू केले. स्थानिक नागरिकांनीही आग विझविण्याचे प्रयत्न केले. आग विझवण्यासाठी देवरुख नगरपंचायतीचे अग्निशामक वाहन बोलावण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.
अंजनारी येथे ट्रक जळून भस्मसात झाल्याच्या घटने पाठोपाठ आता बर्निंग कारचा थरारक अनुभव लोकांना आला. दरम्यान या घटनेने अग्निशमन यंत्रणेची आवश्यकता प्रकर्षाने पुढे आली आहे.

