संतोष कोत्रे लांजा-: एखाद्या वाहनाचा अपघात होऊ दे अथवा गंभीर दुर्घटना, महामार्गातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांचे कपडे खराब होऊ देत. मला काय त्याचे. तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो..
अशीच काहीशी परिस्थिती सध्या लांजा शहरात अनुभवास मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनी यांच्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली असून त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे .
लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर लांजा वासियांच्या त्रासात भर पडली आहे. सध्या तहसील कार्यालय ते हायस्कूल, कुणबी पतसंस्थेपर्यंत च्या अंतरामध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या सर्विस रोडची अतिशय दुरवस्था झाली आहे. रस्ता कुठे आहे ? अशी म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. तहसील कार्यालयासमोर तर मला मोठा खड्डा निर्माण झाला असून त्यात पावसाचे पाणी साटून तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
याबरोबरच संपूर्ण रस्त्याची अक्षरशा चाळण झालेली आहे. त्यातून वाट काढताना वाहन चालक आणि विद्यार्थ्यांची प्रचंड मोठी गैरसोय होत आहे. वाहनांमुळे पाणी उडून विद्यार्थ्यांचे कपडे खराब होत आहेत.
अशीच काळजी परिस्थिती उपशेटेवाडी येथे झाली आहे. या ठिकाणी सर्विस रोडवर एक भला मोठा खड्डा पडला असून त्यात रिक्षा मोटरसायकल सारखी छोटी वाहने अडकून पडत आहेत. काही वेळा पावसाच्या पाण्यामुळे हा खड्डा भरत असून त्याचा अंदाज येत नसल्याने वाहने आपटत आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची देखील शक्यता आहे.
लांजा शहरात मुंबई गोवा महामार्गाच्या सर्विस रोडची इतकी भयावह अवस्था निर्माण झालेली असताना महामार्ग ठेकेदार कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग मात्र चिडीचूप आहे. लोक कितीही आरडाओरडा करू देत. तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो. अशी परिस्थिती आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे लांजावासीय, नागरिक ,पालक वर्ग यांच्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

