लांजा (प्रतिनिधी): लांजा तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून गोवा बनावटीच्या दारूची मोठ्या प्रमाणात आवक आणि विक्री होत आहे. लांजा पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक ठिकाणी गोवा बनावटीचा दारूसाठा आढळून आला आहे .
त्यामुळे चेक पोस्ट वरून अशाप्रकारे गोवा बनावटीचा दारू साठा तालुक्यात येतोच कसा? राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई थंडावली आहे का? असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून लांजा तालुक्यात गोवा बनावटीचा विदेशी दारूचा मोठ्या प्रमाणात महापूर आला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याचे कारण म्हणजे लांजा पोलिसांनी कोंडगे, सापुचेतळे खानवली येथे केलेल्या अनेक दारुविरोधी कारवायांमध्ये विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींकडे गोवा बनावटीचा दारूसाठा आढळून आलेला आहे. लांजा पोलिसांनी हा दारूसाठा जप्त केला असला तरी हा गोवा बनावटीचा दारूसाठा येतोच कुठून? याचे उत्तर मात्र अनुत्तरीत आहे. अगदी खेड्यापाड्यातील चोरट्या दारू विक्रेत्यांकडे गोवा बनवटीचा दारूसाठा आढळून येतो. त्यांच्यापर्यंत हा गोवा बनावटीचा दारूसाठा जर पोहोचत असेल तर त्यामागे एक मोठे रॅकेट असण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
लांजा तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे. मात्र असे असतानाही गोवा बनावटीच्या दारूचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट वाढला आहे. विशेष बाब म्हणजे चेक पोस्ट वरून हा गोवा बनावटीचा दारूसाठा या ठिकाणी येतोच कसा ? त्याला नेमके कोणाचे अभय आहे? कोणाच्या कृपाशीर्वादाने हा सर्व प्रकार सुरू आहे? हा मोठा प्रश्न आहे. अशा अवैधरित्या तालुक्यात येणारा गोवा बनावटीचा दारू साठा रोखण्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग अपयशी ठरला आहे का? की राज्य उत्पादन शुल्क विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे? असा सवाल आता तालुक्यातील जनतेतून केला जात आहे.
स्वस्त दरात उपलब्ध होणाऱ्या या गोवा बनावटीच्या दारूमुळे तालुक्यातील अनेक तरुण मात्र व्यसनाधीन होऊन बिघडत चालले असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेकांचे संसारात भांडणतंटे वाढीस लागले आहेत त्यामुळे या गोवा बनावटीच्या दारूवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून गोवा बनवटीच्या दारू विक्रीची पाळेमुळे उध्वस्त करावीत, अशी मागणी जोर धरत. आहे.

