रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील नगर परिषदेच्या 22 पैकी काही शाळातील मुलांची संख्या घटली आहे. त्यामुळे काही शाळा एकमेकांमध्ये समाविष्ट करत आहोत. अशावेळी रिकाम्या झालेल्या शाळेच्या एखाद्या इमारतीत जनसेवा ग्रंथालयाला योग्य वाटेल, अशा इमारतीत जागा देण्यात येईल, असे ठोस आश्वासन रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांनी दिले.
जनसेवा ग्रंथालय यांच्यावतीने ज्येष्ठ ललित लेखक रवींद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कोकण विभागीय ललित लेखन स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ व बालरोगतज्ञ शरद प्रभुदेसाई लिखित 'परिवर्तन' (लघुकादंबरी), तसेच संगमेश्वरी-तिलोरी बोलीतील लेखक अमोल पालये यांच्या 'गावकी' (कथासंग्रह) चा प्रकाशन कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे बोलत होत्या.
रस्ते, वीज, विकासाची कामे होतचं राहतील, पण उद्याची पिढी घडविण्यासाठी रत्नागिरीच्या प्रत्येक प्रभागात संस्कारवर्ग आणि ग्रंथालय होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने 32 नगरसेवकांना मी याबाबत सुचित केले आहे. अलिकडे मुलांचे वाचन कमी होत आहे. त्यांना वाचनाची गोडी लावणे काळाची गरज आहे. पुर्वी घरात आजी-आजोबा असत. ते गोष्टी सांगत. कुठली पुस्तके वाचायची, हे सांगत. आता विभक्त कुटुंबपध्दतीत मुले केअरटेकरकडे असतात, मात्र मुले संस्कारक्षम होण्यासाठी पुस्तक हेच प्रभावी माध्यम असल्याचेही नगराध्यक्षा सुर्वे म्हणाल्या.
ज्येष्ठ साहित्यिक मदन हजेरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील विजेते मंगेश बापट यांनी स्पर्धेबाबत, ग्रंथालयाबाबत सांगताना जे पुस्तक मुंबईतही मिळू शकले नाही, ते जनसेवा ग्रंथालयात मिळाले, हा अनुभव सांगून ग्रंथालयातील दुर्मिळ, जुन्या ग्रंथसंपदेबाबत कौतूक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक मदन हजेरी यांनी रवींद पिंगे यांचा सहवास, त्यांच्यासोबतच्या आठवणी, त्यांची साहित्य संपदा, पिंगे यांची पुस्तकांविषयीची आत्मीयता, आणि ग्रंथालयांबद्दल त्यांच्या मनात असलेली प्रचंड आस्था याविषयी ह्दयस्पर्षी आठवणी सांगितल्या.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ लेखक श्रीकृष्ण जोशी, प्रसिध्द गझलकार देविदास पाटील, बालरोगतज्ञ डॉ.शरद प्रभुदेसाई, लेखक अमोल पालये, जनसेवाचे अध्यक्ष प्रकाश दळवी, कार्याध्यक्ष राहुल कुलकर्णी, कार्यवाह ओंकार मुळ्ये, डॉ.दिलीप पाखरे, डॉ.बेडेकर, परिक्षक शैलजा लिमये, प्रतिभा प्रभुदेसाई, लोककलावंत सुनील बेंडखळे, जनसेवा ग्रंथालय कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी, ग्रंथपाल पटवर्धन, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिप्ती कानविंदे यांनी केले.

