रत्नागिरी : रत्नागिरीतील संगमेश्वरी-तिलोरी बोलीतील लेखक अमोल पालये यांच्या 'गावकी' या संगमेश्वरी बोलीतील पहिल्या कथासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक मदन हजेरी, ज्येष्ठ लेखक, नाटककार श्रीकृष्ण जोशी, प्रसिध्द गझलकार देविदास पाटील यांच्याहस्ते झाले.
जनसेवा ग्रंथालय, रत्नागिरी यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गावकी हा कथासंग्रह महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेतून प्रसिध्द झाला आहे. कोकणातील विषयांवर लेखन करावं, असं वाटत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील 'गावकी' हा विषय निवडला, आणि त्याअनुषंगाने कथा लिहिल्या. देशाचा कारभार जसा लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली लोकशाहीने चालतो, त्याउलट गावाचा कारभार गावकर, गावातील मानकरी, गावकरी यांच्या नेतृत्वाखाली चालतो. हा गावकार लोकनियुक्त नसतो, तो वंशपरंपरागत असतो. गावातील सण-उत्सवाचे नेतृत्व गावकर विनामानधन, तन-मन-धन अर्पून करत असतो, त्यामुळे गावकाराचा गावात दबदबा निर्माण होतो, आणि त्या दबदब्यातून गावकार आणि त्याची गावकी यांची एक हुकुमशाही सुरू होते. गावकीची ही हुकुमशाही आणि गावातील नवी शिकलेली, सुधारलेली पिढी यांचा जो संघर्ष उभा राहतो, तो संघर्ष 'गावकी'तील कथांमधून उभा केला आहे, असे लेखक अमोल पालये यावेळी बोलताना म्हणाले. या कथा लिहल्यानंतर याच कथामधून संगमेश्वरी-तिलोरी बोलीचा सूर सापडला, आणि या बोलीतील गाणी, आख्यानं, वगनाट्य, बतावण्या, म्हण्णी, लग्नगीतं यांच्या संकलनाचं कामही सुरू केलं, असे पालये यांंनी यावेळी सांगितले.
गझलकार देविदास पाटील यांनी 'गावकी'चा परिचय घडविला. गावकीतील कथा शेवटच्या एका वाक्यात कलाटणी देतात. वृक्षतोडीतून होणारी निसर्गाची हानी, बिबट्याचे अतिक्रमण, गावकीतून होणारा शिक्षणाचा विरोध, कोकणात येणारे प्रकल्प आणि शेती, कोकणातील अंधश्रध्दा, ग्रामीण भागातील निवडणूकांमधील राजकारण अशा अनेक विषयांना या कथा स्पर्श करतात, असे पाटील म्हणाले.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे, ज्येष्ठ साहित्यिक मदन हजेरी, ज्येष्ठ लेखक श्रीकृष्ण जोशी, बालरोगतज्ञ डॉ.शरद प्रभुदेसाई, जनसेवाचे अध्यक्ष प्रकाश दळवी, कार्याध्यक्ष राहुल कुलकर्णी, कार्यवाह ओंकार मुळ्ये, डॉ.दिलीप पाखरे, डॉ.बेडेकर, परिक्षक शैलजा लिमये, प्रतिभा प्रभुदेसाई, लोककलावंत सुनील बेंडखळे, जनसेवा ग्रंथालय कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी, ग्रंथपाल पटवर्धन, कर्मचारी उपस्थित होते.

