Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लोकशाहीर *अण्णा भाऊ साठे यांना 'भारतरत्न' पुरस्कार प्रदान करावा : संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस*

लोकशाहीर *अण्णा भाऊ साठे यांना 'भारतरत्न' पुरस्कार प्रदान करावा : संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस*

डॉ. भारत पाटणकर व प्रा. किसनराव कुराडे यांना लोकशाहीर अण्णा भाऊ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर (प्रतिनिधी)

*प्रतापसिंह काळे*

: अण्णा भाऊ जातीच्या पुढे जाऊन जातीअंताची भूमिका घेणारे साहित्यिक होते.

अण्णाभाऊंनी सर्व जातीच्या लोकांची बेरीज केली. त्यांना लिखाणाचे विषय बनवले. त्यांनी सर्व देशभक्तांची बेरीज केली. देशाच्या कल्याणासाठी सर्व विचारांची बेरीज करण्याचा पहिला प्रयत्न अण्णाभाऊंनीच केला. जातव्यवस्था नाष्ट झाली पाहिजे ही त्यांची भूमिका होती. स्त्रियांना सन्मान मिळाला पाहिजे असे त्यांचे मत होते. अण्णा भाऊ प्रखर राष्ट्रभक्त होते. वंचित, शोषित आणि कामगार वर्गाच्या प्रश्नांना आपल्या अफाट साहित्याद्वारे जागतिक पातळीवर पोहोचवणाऱ्या, तसेच कला व साहित्यात ऐतिहासिक योगदान देणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

ते सत्यशोधक इतिहास परिषद आयोजित पहिल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनात राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे बोलत होते.

यावेळी मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने मानाचा, सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ दिशादर्शक विचारवंत डॉ. भारत पाटणकर आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी डॉ. भारत पाटणकर म्हणाले, जगभर नव्या शोषणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे मानवमुक्तीची नवी व्यापक चळवळ उभी करणे गरजेचे आहे. भारतात नवी जात आणि धर्माची प्रभावी गुलामी लादली जात असून नव्या स्वातंत्र्याची लढाई सुरू करावी लागणार आहे.

यावेळी प्रा. किसनराव कुराडे म्हणाले, साहित्यिकांनी निर्भय होऊन लिहिणे गरजेचे आहे. तरुण कवी, लेखकांनी मानवकेंद्री लेखन करावे. देश हिताची भूमिका घ्यावी.

तत्पूर्वी डॉ. कपिल राजहंस व मदन पवार संपादित मानवतावादी अण्णा भाऊ साठे या महाग्रंथाचे प्रकाशन करून संमेलनाचे उद्घाटन शाहीर दिलीप सावंत आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शाहीर दिलीप सावंत म्हणाले, आज महामानवांचे विचार पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे. शाहिरांनी व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवण्याचे काम केले पाहिजे.

दुसर्‍या सत्रात 'अण्णाभाऊंच्या साहित्यातील जातिअंताचा विचार' या महत्त्वपूर्ण विषयावर परिसंवाद पार पडला. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. आलोक जत्राटकर होते तर डॉ. वैशाली चौगुले आणि राहुल सडोलीकर यांनी वरील विषयावर मांडणी केली.

तिसर्‍या सत्रात कवी, प्रकाशक व दिग्दर्शक अनिल म्हमाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कवी संमेलनात शंभर हून अधिक कवींनी आपल्या विविध सामाजिक विषयावर कविता सादर केल्या.

डॉ. शोभा चाळके, मदन पवार, डॉ. डी. वाय. जमादार, डॉ. वसंत भागवत, अ‍ॅड. करुणा विमल, सुरेश केसरकर, दीपक गोठणेकर, डॉ. अमोल महापुरे, प्रा. दादासाहेब ढेरे, अंतिमा कोल्हापूरकर, विश्वासराव तरटे, शंकर पुजारी, सुनिल जाधव, विद्रोही कवी पि. के. यांची मनोगते झाली.

अण्णा ब्रिगेड, महाराष्ट्र, कृष्णात ज्योती यशवंत, डॉ. नागनाथ घोरपडे, सुनील जाधव, राजकुमार डोंबे, अर्जुन जाधव, डॉ. श्रेया माशाळ, लक्ष्मण गायकवाड, राणी गायकवाड, मारुती कांबळे, डॉ. आशा गिरी, जयवंतराव वायदंडे, उ. फ. जानराव, संजय वाघमारे, रुपेश राऊत यांना लोकशाहीर अण्णा भाऊ राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.

विश्वास सुतार, मिलिंद यादव, डॉ. दयानंद ठाणेकर, लालासाहेब नाईक, अ‍ॅड. रणजित कवाळे, शिवाजीराव परुळेकर, कबीर फिरस्ता यांच्यासह महाराष्ट्रातील साहित्यिक व विचारवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वागत स्वागताध्यक्ष साहित्यिक व विचारवंत डॉ. डी. वाय. जमादार यांनी प्रास्ताविक डॉ. कपिल राजहंस यांनी तर सूत्रसंचालन अभिजीत मासुर्लीकर यांनी केले. आभार अंतिमा कोल्हापूरकर यांनी मानले.

फोटो

मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने मानाचा, सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ दिशादर्शक विचारवंत डॉ. भारत पाटणकर आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे यांना प्रदान करतांना संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यावेळी डावीकडून डॉ. शोभा चाळके, मदन पवार, अनिल म्हमाने, डॉ. कपिल राजहंस, डॉ. डी. वाय. जमादार, डॉ. वसंत भागवत, अ‍ॅड. करुणा विमल, सुरेश केसरकर, दीपक गोठणेकर, डॉ. अमोल महापुरे, प्रा. दादासाहेब ढेरे, अंतिमा कोल्हापूरकर, शंकर पुजारी, सुनिल जाधव, डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. वैशाली चौगुले आणि राहुल सडोलीकर, विद्रोही कवी पि. के. आणि मान्यवर

सत्यशोधक इतिहास परिषद

आयोजित पहिले

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनातील

ठराव

ठराव - 1

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना 'भारतरत्न' पुरस्कार प्रदान करावा.

वंचित, शोषित आणि कामगार वर्गाच्या प्रश्नांना आपल्या अफाट वाङ्मयाद्वारे जागतिक पातळीवर पोहोचवणाऱ्या, तसेच कला व साहित्यात ऐतिहासिक योगदान देणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे.

ठराव - 2

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावरील सर्व कॉपीराइट (मालकी हक्क) समाप्त करून ते सर्वसामान्यांसाठी खुले करावे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे विचार आणि साहित्य प्रत्येक घराघरांपर्यंत, तळागाळातील वाचकांपर्यंत कोणतीही आर्थिक अडचण किंवा व्यावसायिक बंधने न येता विनासायास पोहोचावे, यासाठी त्यांच्या साहित्यावरील सर्व कॉपीराइट (मालकी हक्क) काढून घेऊन ते साहित्य सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे खुले करण्यात यावे.

ठराव - 3

अण्णा भाऊ साठे यांच्या समग्र लेखन साहित्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील मानवतावाद, श्रमनिष्ठा आणि सामाजिक जाणिवांचा व्यापक प्रसार व्हावा, यासाठी त्यांच्या साहित्याचा शालेय अभ्यासक्रमात सक्तीने समावेश करावा.

ठराव - 4

अण्णा भाऊ साठे यांच्या मूळ साहित्याचे व हस्तलिखितांचे जतन आणि डिजिटल संवर्धन करावे

अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेले साहित्य, शाहिरी, पोवाडे, कथा आणि लोकनाट्यांच्या हस्तलिखितांचे शासकीय स्तरावर योग्य जतन करण्यात यावे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे स्वतंत्र डिजिटल अभिलेखागार तयार करावे.

ठराव - 5

अण्णा भाऊ साठे यांच्या ऐतिहासिक योगदानावर आधारित विशेष राष्ट्रीय संशोधन केंद्र स्थापना करावे.

मुंबईच्या गिरणगावातील कामगार लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि शोषित वर्गाच्या आंदोलनात अण्णा भाऊ साठे यांनी दिलेल्या ऐतिहासिक योगदानावर सखोल संशोधन करण्यासाठी एका समर्पित राष्ट्रीय संशोधन केंद्राची स्थापना करावी.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital