Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
माध्यमिक शाळा बंद पडल्याने अणसुरे ग्रामस्थांचे सभापतींना निवेदन

माध्यमिक शाळा बंद पडल्याने अणसुरे ग्रामस्थांचे सभापतींना निवेदन

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील अणुसरे येथील श्री सिद्धिविनायक माध्यमिक विद्यालयातील ८ वी ते १० वीचे वर्ग अचानक बंद पडल्याने विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही शाळा पूर्ववत सुरू करण्यात यावी, या मागणीकरीता पालक व ग्रामस्थांनी पंचायत समितीवर धडक देत सभापती नंदिनी कदम यांना निवेदन सादर केले. त्याचप्रमाणे तहसीलदार, प्रांताधिकारी यांनाही निवेदने देण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी गावकऱ्यांना शाळेतील सर्व शिक्षकांच्या बदल्या झाल्याची माहिती मिळाली. मात्र, त्यांच्या जागी नवीन शिक्षकांची नियुक्ती अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे ८ वी, ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून पालकांमध्येही अस्वस्थता पसरली आहे. सुमारे ३० वर्षांपूर्वी अणुसरे गावात मुलींच्या शिक्षणासाठी विशेष बाब म्हणून या माध्यमिक शाळेची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी गावाजवळ माध्यमिक शिक्षणाची सुविधा नसल्याने अनेक मुलींना सातवीनंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागत होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामस्थांच्या प्रयत्नातून ही शाळा सुरू करण्यात आली होती.

गेल्या तीन दशकांत या शाळेने हजारो विद्यार्थ्यांना घडविले असून अनेक विद्यार्थी डॉक्टर, नर्स, अभियंते, वकील, शिक्षक, सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी, सैनिक तसेच विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत. शाळेचा दहावीचा निकालही अनेक वेळा शंभर टक्के लागल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. गावापासून पाच किलोमीटरच्या परिसरात दुसरी कोणतीही माध्यमिक शाळा उपलब्ध नाही. त्यामुळे शाळा कायमस्वरूपी बंद झाल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. विशेष म्हणजे गावात काही दिव्यांग विद्यार्थीही शिक्षण घेत असून त्यांच्या हिताचाही विचार करणे आवश्यक असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येऊ नये, यासाठी शासनाने तातडीने आवश्यक शिक्षकांची नियुक्ती करून अणुसरे येथील श्री सिद्धिविनायक माध्यमिक विद्यालयातील ८ वी ते १० वीचे वर्ग पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी ग ग्रामपंचायत, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी केली आहे. सदरचे निवेदन सभापती नंदिनी कदम यांना देण्यात आले आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर, पंढरीनाथ मयेकर आदी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी पालक श्रुती नंदकुमार गोलतकर यांनी सांगितले की, माझी मुलगी राजनंदिनी गोलतकर ही ९७ टक्के दिव्यांग आहे. तिला स्वतःहून चालता येत नाही. ती अणसुरे हायस्कूलमध्ये इयत्ता ९ वी मध्ये शिकत आहे. मात्र अचानक शाळा अचानक बंद झाल्यामुळे दूरच्या शाळेमध्ये तिला घेऊन रोज ये-जा करणे आर्थिक दृष्ट्या शक्य नाही. आमची परिस्थिती बेताची असल्याने तिचे शिक्षण खंडित होईल. अगोदरच शाळा बंद पडल्याचे समजल्यापासून ती मानसिकदृष्ट्या खचली आहे. त्यामुळे अणसुरे येथील शाळा बंद करण्याचा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावा.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital