पोलीस व नातेवाईकांकडून शोध सुरूराजापूर प्रतिनिधी: महामार्गावर वाकेड नजीकच्या पुलावरून मुचकुंदी नदीत एका ६२ वर्षीय इसमाने उडी मारल्याची घटना गुरूवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
नदीत उडी मारणाऱ्या या व्यक्तीचे नाव यशवंत खेमा आमटे (६२ ) रा. कोंडतिवरे डोंगरवाडी राजापूर असे असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस व त्याचे नातेवाईक त्या इसमाचा शोध घेत आहेत.
तालुक्यातील कोंडतिवरे डोंगरवाडी येथील यशवंत खेमा आमटे हे बुधवार पासून घरात नव्हते. त्यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते, यावेळी ते वाकेड येथे नातेवाईकांकडे असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. गुरूवारी सकाळी ते वाकेड येथील नातेवाईकांकडून निघाले होते, मात्र ते घरी परतले नव्हते. दरम्यान गुरूवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान वाकेड मुचकुंदी नदीवरील पुलाच्या कढडयावर एक तांबडा टी शर्ट व काळी हाफ पॅन्ट घालून असलेला इसम उभा होता व त्याने तेथून थेट नदीपात्रात उडी मारल्याचे लांजाकडून वाटूळकडे एसटी बसने प्रवास करणाऱ्या एका चव्हाण नामक व्यक्तीने बसमधून पाहिले होते. त्यांनी तात्काळ याबाबत दुरध्वनीद्वारे राजापूर पोलीसांत माहिती दिली. तात्काळ राजापूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली व तपास सुरू केला. मात्र तेथे कोणीच आढळून आले नाही. मुसळधार पावसामुळे नदीलाही पुर आलेला असल्याने कदाचित ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेले असावेत असा पोलीसांचा कयास आहे.
राजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पहाणी केली व शोध घेतला. तर लांजा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनीही घटनास्थळी भेट दिली.
या घटनेची माहिती आमटे यांच्या नातेवाईकांनाही देण्यात आली. त्या व्यक्तीने केलेले वर्णन व कपडे सांगितल्यानंतर आमटे यांच्या नातेवाईकांनी ते आमचे नातलग असल्याचे सांगितले. तसेच वाकेड येथे ज्या नातेवाईकांकडे ते गेले होते तेथेही पोलीसांनी चौकशी केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असुन नदीपात्रातही पोलीस व नातेवाईक शोध घेत आहेत.

