Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
माजी कॅप्टन मनोहर पडयाळ यांची तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड

माजी कॅप्टन मनोहर पडयाळ यांची तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड

चिपळूण (प्रतिनिधी) : ग्रुप ग्रामपंचायत काडवली-कुंभवली येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी माजी कॅप्टन मनोहर पडयाळ यांची निवड झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. देशसेवेत महत्त्वपूर्ण योगदान दिल्यानंतर सामाजिक कार्याची वाटचाल सुरू ठेवणाऱ्या पडयाळ यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वगुणांचा गावातील सामाजिक सलोखा व शांतता प्रस्थापित करण्यासाठी निश्चितच उपयोग होईल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ, काडवली झगडेवाडी, ग्रामस्थ तसेच महिला मंडळाच्या वतीने मनोहर पडयाळ यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

देशसेवेनंतर समाजसेवेची नवी जबाबदारी

मनोहर पडयाळ यांनी भारतीय सैन्य दलात सेवा बजावत देशाच्या संरक्षणासाठी योगदान दिले आहे. सैनिकी सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही समाजाशी असलेली बांधिलकी कायम ठेवत त्यांनी स्थानिक पातळीवर सामाजिक कार्यात सहभाग घेतला आहे. त्यामुळे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याने त्यांच्या अनुभवाचा गावाला फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

गावातील किरकोळ वाद-विवाद संवादातून मिटविणे, नागरिकांमध्ये सलोखा निर्माण करणे, सामाजिक ऐक्य मजबूत करणे आणि गावातील शांततामय वातावरण कायम ठेवणे, ही तंटामुक्त समितीची महत्त्वाची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर माजी सैनिक असलेल्या पडयाळ यांची निवड विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त स्वागत

पडयाळ यांच्या निवडीबद्दल विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ, झगडेवाडी येथील ग्रामस्थ आणि महिला मंडळाच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. 'आपण देशाची सेवा करून आलात, आपल्या कार्याला सलाम. आता गावाच्या सामाजिक विकासासाठी आणि शांततेसाठीही आपण प्रभावीपणे काम कराल,' अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी काडवली झगडेवाडी येथील विठ्ठल रखुमाई सेवा मंडळाचे वसंत खाडे, लक्ष्मण खाडे, मारुती पडयाळ, नारायण पड्याळ, पांडूरंग चव्हाण, संभाजी हेमण, भिकाजी हेमण, नारायण खाडे, वसंत पडयाळ, तुकाराम पडयाळ, सोनू झुजम, बाळाराम अदावडे, कृष्णा खाडे, कृष्णा गोरिवले, गणेश गोरिवले, हरिश्चंद्र हेमण, संतोष खाडे, रावजी डांगे, सुरेश सुर्वे, राजाराम हेमण, कृष्णा पड्याळ कु. कुणाल शिगवण, प्रमोद पडयाळ, कु .सुरज चव्हाण सौ. मनिषा पडयाळ, सौ. हिरु आदवडे, सौ. सुनंदा हेमण, सौ. सुनिता खाडे, सौ. वंदना हेमण, प्रकाश पडयाळ, दिनकर खाडे, सौ. वंदना पडयाळ, सौ. जयवंती पडयाळ, श्री. डांगे श्री. महाडिक आदी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital