सिंधुदुर्गाच्या सागरी इतिहासावर राजधानी दिल्लीत नवा प्रकाश
डॉ. ज्योती तोरसकर यांच्या संशोधनपर लेखाचे जेएनयू मध्ये सादरीकरण
राष्ट्रीय परिसंवादात तळ कोकणाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एकमेव महिला संशोधक
महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या विशेष निमंत्रणाने सादरीकरण
अमित खोत | मालवण : सिंधुदुर्गाच्या सागरी इतिहासातील महत्त्वपूर्ण, मात्र आजवर व्यापक ऐतिहासिक चर्चेपासून काहीसे दूर राहिलेले 'मोरयाचा धोंडा' हे शिलास्थळ आता राष्ट्रीय पटलावर पोहोचले आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) आयोजित राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक परिसंवादात मालवणच्या या ऐतिहासिक शिलास्थळावर आधारित संशोधनपर लेखाचे सादरीकरण डॉ. ज्योती बुवा तोरसकर यांनी केले. विशेष म्हणजे, तळ कोकणातून या राष्ट्रीय परिसंवादात सहभागी झालेल्या त्या एकमेव महिला संशोधक ठरल्या.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या विशेष निमंत्रणाने डॉ. तोरसकर यांना राष्ट्रीय शैक्षणिक व्यासपीठावर संशोधन मांडण्याची संधी मिळाली. त्यांच्या संशोधनातून 'मोरयाचा धोंडा' या शिलास्थळाचे ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि वास्तुशिल्पीय महत्त्व देशभरातील इतिहास अभ्यासक आणि संशोधकांसमोर प्रभावीपणे मांडण्यात आले.
*शिवकालीन संदर्भातून 'मोरयाचा धोंडा'चा अभ्यास*
छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्गाच्या निर्मितीपूर्वी मालवणच्या समुद्रकिनारी असलेल्या 'मोरयाचा धोंडा' येथे गणेशपूजन व सागरपूजन केल्याचा संदर्भ, तसेच या परिसरातील विविध शिलाचिन्हे आणि त्यांचे धार्मिक-सांस्कृतिक महत्त्व डॉ. तोरसकर यांनी संशोधनातून मांडले. या शिलास्थळावर आढळणारी चंद्र, सूर्य, गणेश, शिवलिंग, नंदी आणि पादुका यांसारखी शिलाचिन्हे, त्यामागील स्थानिक परंपरा तसेच सिंधुदुर्गासह सागरी किल्ल्यांच्या निर्मितीपूर्वी झालेल्या धार्मिक-सांस्कृतिक विधींचा संदर्भ ऐतिहासिक दस्तऐवज, स्थानिक परंपरा आणि स्थलसाक्ष यांच्या आधारे त्यांनी अभ्यासला.
*नवी दिशा समोर*
या संशोधनामुळे सिंधुदुर्गाचा इतिहास केवळ युद्ध, आरमारी सामर्थ्य किंवा किल्ल्यांच्या स्थापत्यापुरता मर्यादित न ठेवता धार्मिक-सांस्कृतिक परंपरा आणि सागरी राज्यनिर्मितीच्या व्यापक संदर्भातून पाहण्याची नवी दिशा समोर आली आहे.
*किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या पाठपुराव्याचीही दखल*
'मोरयाचा धोंडा'च्या जतन, संवर्धन आणि शासकीय स्तरावरील नोंदींसाठी किल्ले प्रेरणोत्सव समितीने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची देखील या निमित्ताने दखल घेण्यात आली. समितीच्या प्रयत्नांमुळे या ऐतिहासिक स्थळाचा सातबारा उतारा उपलब्ध होणे, शासकीय अभिलेखांमध्ये त्याची नोंद होणे तसेच स्थळाला शासकीय पूजेचा मान मिळणे, या बाबी विशेष उल्लेखनीय ठरल्या. या प्रयत्नांबद्दल परिसंवादातील मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.
*जेएनयूमध्ये संशोधनाचे कौतुक*
या राष्ट्रीय कार्यक्रमाला तंजावरचे बाबाराजे भोसले, रघुजी आंग्रे, JNUच्या कुलगुरू प्रा. शांतिश्री धुलिपुडी पंडित, तसेच देशातील विविध विद्यापीठांतील प्राध्यापक, संशोधक आणि इतिहास अभ्यासक उपस्थित होते.विविध राज्यांतून आलेल्या तज्ज्ञांसमोर 'मोरयाचा धोंडा' या विषयाचे सादरीकरण झाल्याने सिंधुदुर्गाच्या या ऐतिहासिक स्थळाची माहिती देशभरातील अभ्यासकांपर्यंत पोहोचली. चर्चासत्राचे अध्यक्ष जेएनयु विद्यापीठाचे प्रा. नवेंदु शेखर यांनी डॉ. तोरसकर यांच्या सादरीकरणाचे तसेच त्यांनी सादर केलेल्या संदर्भ साहित्याचे विशेष कौतुक केले.
सादरीकरणानंतर अनेक मान्यवरांनी 'मोरयाचा धोंडा' प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा व्यक्त केली. या स्थळाविषयी प्रथमच संशोधनाधारित आणि सविस्तर माहिती मिळाल्याचेही अनेक अभ्यासकांनी नमूद केले.
*संशोधनाला नवी दिशा*
सिंधुदुर्गाच्या सागरी इतिहासावर दीर्घकाळ संशोधन करणाऱ्या डॉ. ज्योती तोरसकर यांच्या या अभ्यासामुळे 'मोरयाचा धोंडा' हे स्थळ केवळ स्थानिक श्रद्धेचा विषय न राहता राष्ट्रीय ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पुरातत्त्वीय चर्चेचा विषय बनण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
*डॉ. सुमेधा नाईक यांचे महत्त्वपूर्ण योगदान*
या संशोधनपर लेखाच्या प्रभावी सादरीकरणासाठी स्लाइड तयार करण्यामध्ये डॉ. सुमेधा नाईक यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. या संशोधनपर लेखाला संशोधनात्मक स्वरूप देणे, त्याची हिंदी भाषेत मांडणी करणे आणि JNUमधील सादरीकरणाची प्रभावी तयारी करण्यामध्ये डॉ. सुमेधा नाईक यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले.
*चर्चेच्या केंद्रस्थानी*
स्थानिक इतिहासातील दुर्लक्षित शिलास्थळाला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देत 'मोरयाचा धोंडा'ला देशाच्या इतिहास व सांस्कृतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या संशोधनातून झाले आहे. या निमित्ताने स्थळाच्या पुढील ऐतिहासिक, पुरातत्त्वीय, धार्मिक आणि सांस्कृतिक अभ्यासासाठी नवी दारे खुली झाली असून, सिंधुदुर्गाच्या सागरी वारशाच्या संशोधनाला राष्ट्रीय पातळीवर नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे

