Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मांडकी बुद्रुक येथे भव्य 'कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र' व 'रानभाज्या पाककला स्पर्धा' उत्साहात

मांडकी बुद्रुक येथे भव्य 'कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र' व 'रानभाज्या पाककला स्पर्धा' उत्साहात

मांडकी बुद्रुक येथे भव्य 'कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र' व 'रानभाज्या पाककला स्पर्धा' उत्साहातचिपळूण (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय (मांडकी-पालवण) यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (RAWE) एक महत्त्वपूर्ण उपक्रम पार पडला.

येथील जि. प. श्री नेटकेश्वर विद्यामंदिर (मांडकी क्र. १) येथे कृषी कन्यांच्या पुढाकाराने भव्य 'कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र' आणि 'रानभाज्या पाककला स्पर्धेचे' यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
परिसरातील शेतकरी बांधवांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, प्रगत कृषी साधने, नवीन वाण तसेच कृषी क्षेत्रातील अद्ययावत घडामोडींची एकाच छताखाली अचूक माहिती मिळावी, या मुख्य उद्देशाने या माहिती केंद्राची उभारणी करण्यात आली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. संकेत कदम यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या उद्घाटनाच्या भाषणात त्यांनी शेतीचा वर्तमान व भविष्य या विषयाचा आढावा घेत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे यांनी निसर्गातील लोप पावत असलेल्या पारंपरिक रानभाज्यांचे पोषणमूल्य आणि मानवी आरोग्यातील महत्त्व स्पष्ट केले. तसेच अशा महत्त्वाच्या रानभाज्यांचे जतन व संवर्धन करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मांडकीचे पोलिस पाटील सचिन खैर यांनी कृषीकन्यांच्या या उपक्रमाचे आणि त्यांच्या समाजोपयोगी कामाचे मनापासून कौतुक केले. या कार्यक्रमास दोन्ही महाविद्यालयांचे प्राध्यापक, प्राध्यापिका, मांडकी बुद्रुकचे ग्रामसेवक योगेश सोनवणे, मांडकी खुर्दचे सरपंच सोनू धुमक तसेच पोलिस पाटील संजय धुमक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राला भेट दिली. कृषीकन्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे आणि दोन्ही महाविद्यालयांच्या योगदानाचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital