चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील कुटरे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी मंगेश पांचाळ यांना स्टार्ट अप शिक्षा फाउंडेशन नवी दिल्ली यांचे वतीने डॉ. भीमराव आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
मंगेश पांचाळ हे मूळचे राजापूर तालुक्यातील बागवेवाडी येथील रहिवासी आहेत.
रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये ते ३२ वर्षे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना क्रिकेट व गायनाची आवड आहे. युट्युबवर देखील त्यांचे भजन प्रसिद्ध आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा असून त्यांना यापूर्वी अनेक संस्थेमार्फत पुरस्कार मिळालेले आहेत. नुकतेच त्यांना छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता जाहीर झालेला पुरस्कार हा मानाचा पुरस्कार असून डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना अभिप्रेत असणारे कार्य आपण करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदर पुरस्कार जाहीर झाल्यामुळे ग्रामपंचायत कुटरे, तंटामुक्त समिती कुटरे, महिला मंडळ कुटरे, ग्रामस्थ कुटरे, ग्रामपंचायत अधिकारी संघटना चिपळूण, बागवेवाडी उत्कर्ष मंडळ मुंबई व ग्रामस्थ, तसेच कुलदैवत प्रासादिक भजन मंडळ बागवेवाडी (पांचाळ भावकी) यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

