Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीमुळे महाधनेश पक्षाचे लांजा तालुक्यातील अस्तित्व धोक्यात

मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीमुळे महाधनेश पक्षाचे लांजा तालुक्यातील अस्तित्व धोक्यात

संतोष कोत्रे लांजा-: जंगलाचा शेतकरी' म्हणून संबोधल्या जाणाऱ्या आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या निसर्ग पर्यटनाचा चेहरा म्हणून, जिल्ह्याची प्रमुख प्रजाती म्हणून निवड करण्यात आलेल्या महाधनेश (ग्रेट इंडियन हॉर्नबिल) या दुर्मिळ पक्षाचे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या वृक्षतोडीमुळे तालुक्यातील अस्तित्व धोक्यात आले आहे.

संपूर्ण भारतात धनेश पक्षाच्या ९ प्रकारच्या प्रजाती आढळतात. त्यापैकी तब्बल ४ प्रजाती या एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात वास्तव्य करतात. साधारणपणे महाधनेश हा पक्षी ५० ते ६० वर्षे जगतो आणि आयुष्यभर एकाच जोडीदारासोबत राहतो. मोठ्या झाडांच्या ढोलीत त्याची वास्तव्य असते. या दुर्मिळ पक्षाला 'जंगलाचा शेतकरी' असेही म्हणतात, कारण तो जंगलाच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावतो.महाधनेश हा फळे खाल्ल्यानंतर त्यांची विष्ठा दूरवर टाकून हे पक्षी जंगलाची पुनर्निर्मिती करतात.
काही वर्षांपूर्वी महाधनेश हा पक्षी मादी पक्षासोबत ठिकठिकाणी सर्रासपणे आढळून यायचा. त्याचे जागोजागी दर्शन व्हायचे. मात्र गेल्या काही वर्षात लांजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. याचा फटका या दुर्मिळ पक्षाला बसला आहे. स्थानिक पातळीवर वनविभागाचे जंगलतोडीवर नियंत्रण राहिलेले नसल्याने जंगले नामशेष होत चालली असून त्यामुळे आपसूकच महाधनेशची वस्तीस्थाने देखील शिल्लक राहिलेली नाहीत. त्यामुळे अधिवासाला धोका निर्माण झाल्याने त्याचे अस्तित्व देखील धोक्यात आले आहे. जंगलतोड ही शेतकऱ्यांच्या गरजेपुरती मर्यादा न राहता तो लाकूड व्यवसाय बनला गेल्याने महाधनेश हा दुर्मिळ पक्षी धोक्यात आला आहे.
एकीकडे शासनाने रत्नागिरी जिल्ह्यातील वन पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि संवर्धनासाठी 'महाधनेश' या पक्षाची जिल्ह्याची प्रमुख प्रजाती म्हणून निवड केली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी
स्थानिक निसर्गप्रेमी आणि 'सह्याद्री संकल्प सोसायटी' यांच्या पुढाकारातून 'धनेशाची राई' सारखे उपक्रम राबवले जात आहेत. तर काही महिन्यांपूर्वी वन
विभागाने पुढाकार घेत 'धनेशमित्र संमेलन' आयोजित केले होते. त्यामध्ये महाधनेश पक्षाला रत्नागिरीच्या निसर्ग पर्यटनाचा चेहरा बनवण्यात आले आहे.
असे असताना लांजा तालुक्यात मात्र महाधनेश पक्षाचे अस्तित्व नष्ट होईल की काय?अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या गरजेपेक्षा जंगल संपत्ती हा व्यवसाय बनल्याने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. या वृक्षतोडीमुळे महा धनेश च्या अस्तित्वावर घाला आला आहे. त्याची प्रजनन क्षमता १० टक्क्यावर आली आहे. ही
धोक्याची घंटा मानली जात आहे. गिधाड पक्षपाठोपाठ महा धनेश चे अस्तित्व जंगलतोडमुळे धोक्यात आले असून शासनाने तातडीने याची दखल घेत जंगलतोडीवर आ निर्बंध घातले नाहीत तर दुर्मिळ होत चाललेल्या महा धनेश यापुढे दृष्टीस देखील पडणार नाही. महाधनेश वाचला तर जंगले वाचतील. हे बाब लक्षात घेऊन शासनाने महा धनेश च्या संवर्धना बरोबरच वृक्षतोडीवर कठोर निर्बंध लादण्याची आवश्यकता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital