Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुनावळे जलपर्यटन प्रकल्पाला गती; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पाला गती; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

मुंबई, : मुनावळे जलपर्यटन प्रकल्प हा राज्याच्या पर्यटन विकासासाठी तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठीही अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

आज विधानभवनात पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत जलपर्यटन प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. राज्यातील जलपर्यटनाला नवी चालना देणे हा प्रमुख उद्देश आहे. तसेच सातारा जिल्हा राज्यातील महत्त्वाचे जलपर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्यास मदत होणार आहे.

मुनावळे (शिवसागर जलाशय) परिसराचा जागतिक दर्जाचे जलपर्यटन केंद्र (Aqua Tourism Hub) म्हणून विकास करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या भागातील समृद्ध नैसर्गिक संपदा आणि उपलब्ध जलसाठ्यामुळे पर्यटन विकासाला मोठी संधी उपलब्ध असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पाचा आराखडा, प्रस्तावित मंजुरी, आवश्यक पायाभूत सुविधा आणि भविष्यातील विकास आराखड्याचा बैठकीत आढावा घेण्यात आला. प्रकल्पासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय मान्यता आणि विविध विभागांच्या परवानग्या निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना देसाई यांनी दिल्या. तसेच प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर वेळेचे नियोजन आणि विभागांमधील समन्वय राखण्यावर त्यांनी भर दिला.

कोयना जलाशय परिसरात जागतिक दर्जाच्या जलपर्यटन सुविधा उभारण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या अंतर्गत नौकाविहार, जलक्रीडा, पर्यटक सुविधा केंद्र आणि अन्य पर्यटन सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार हा निधी सुमारे ९२ कोटींपेक्षा अधिक करण्यात आला आहे. विविध विभागांच्या आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

याच बैठकीत किल्ले प्रतापगडावरील पर्यटन विकासाचाही आढावा घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी अंगरक्षक वीर जिवाजी महाले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह भव्य स्मारक उभारण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. स्मारकासाठी आवश्यक जागा निश्चित करून प्रस्ताव तातडीने अंतिम करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

बैठकीला पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे(भा.प्र.से) पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी(भा.प्र.से), पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे आणि उपसचिव विजय पोवार उपस्थित होते. सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, वन विभाग, जलसंपदा विभाग आणि इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. सर्व विभागांनी समन्वयाने कार्यवाही करून दोन्ही प्रकल्पांची अंमलबजावणी गतीने पूर्ण करावी, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

*आमच्या बद्दल:*

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागची ३१ मे २०१६ रोजी स्थापना झाली. राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि पर्यटन क्षेत्र अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने या विभागाची स्थापना करण्यात आली. पर्यटन आणि संस्कृती यांची नाळ एकमेकांशी घट्ट जोडलेली आहे. कारण ऐतिहासिक स्मारके, लोककला आणि स्थानिक परंपरा या केवळ सांस्कृतिक ठेवा नसून पर्यटन आकर्षण म्हणूनही ओळखल्या जातात. हेच लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणि या क्षेत्रांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ स्तरावरील विभाग स्थापन केला.

सदर विभाग महाराष्ट्रातील अद्वितीय कला प्रकार, परंपरा आणि ऐतिहासिक स्थळे जपण्यासाठी, त्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करण्यासाठी कार्य करतो. तसेच, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवून, पर्यटन विकासाला चालना देऊन हा विभाग राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये महत्त्वाचे योगदान देत आहे. सदर विभागाच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र राज्य केवळ एक पर्यटन स्थळ म्हणूनच नव्हे, तर एक जिवंत संस्कृती आणि वारसा असलेले राज्य म्हणून अधिक समृद्ध आणि आकर्षक बनत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital