राजापूर (प्रतिनिधी): सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेले नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन राजापूर तालुक्यातील वडदहसोळ येथील एका ३१ वर्षीय डॉक्टरला ब्लॅकमेल करत २ लाख २५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी भीतीपोटी २५ हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केल्यानंतर, अखेर संबंधित डॉक्टरने पोलिसांत धाव घेतली असून लांजा तालुक्यातील साटवली येथील सिध्देश यशवंत आंबरे या तरुणाविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजापूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडदहसोळ म्हादयेवाडी येथील रहिवासी असलेले फिर्यादी अक्षय गिरीधर म्हादये (वय ३१) हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. सन २०२५ मध्ये (नक्की तारीख माहीत नाही) त्यांचा सोशल मिडिया अकाऊंटवरून एका महिलेशी संपर्क झाला होता. त्यानंतर त्या महिलेच्या सांगण्यावरून फिर्यादी डॉक्टरने स्वतःचे काही नग्न फोटो तिच्यासोबत शेअर केले होते. २२ मे २०२६ रोजी सकाळी १०:०० ते १०:०५ वाजण्याच्या सुमारास, या जुन्या फोटोंचा गैरवापर करून संबधीत आरोपीने डॉक्टरला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
आरोपी सिद्धेश जयवंत आंबरे (वय ३०, रा. साडवली, ता. लांजा) याने आपल्या व्हॉट्सअॅप नंबरवरून फिर्यादी डॉक्टरच्या व्हॉट्सअॅपवर ते नग्न फोटो पाठवले आणि हे फोटो इतरत्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हे फोटो सोशल मीडियावरून हटवण्यासाठी आणि कोणाला न दाखवण्यासाठी आरोपी सिद्धेश याने डॉक्टरकडे एकूण २ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली. या धमकीमुळे पुरते घाबरलेल्या फिर्यादी डॉक्टरने तातडीने गुगल पे द्वारे २५ हजार रुपये आरोपी सिद्धेश आंबरे याच्या खात्यावर ट्रान्सफर केले.
मात्र, मानसिक त्रास आणि पैशांची मागणी थांबत नसल्याने अखेर फिर्यादी डॉक्टरने २७ मे २०२६ रोजी रात्री ११:२१ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीवरून आरोपी सिद्धेश जयवंत आंबरे याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १५१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (२), ३५१ (२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव करत आहेत.

