Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नवी मुंबईत अत्याधुनिक ITMS प्रणालीची अंमलबजावणी

नवी मुंबईत अत्याधुनिक ITMS प्रणालीची अंमलबजावणी

58 चौकांवर AI आधारित स्मार्ट वाहतूक व्यवस्थापन

वी मुंबई : नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थापन अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अर्थात ITMS प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत शहरातील 58 महत्त्वाच्या चौकांवर आणि प्रमुख मार्गांवर कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI आधारित वाहतूक नियंत्रण प्रणाली बसविण्यात येणार असून केंद्रीकृत कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून संपूर्ण यंत्रणेवर नियंत्रण ठेवले जाणार आहे.

प्रकल्पाबाबत माहिती देताना कंपनीचे प्रतिनिधी करण आणि कुशल यांनी सांगितले की, नवी मुंबईच्या वाढत्या वाहतुकीचा विचार करून हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. पारंपरिक आणि ठराविक वेळेनुसार चालणाऱ्या सिग्नल व्यवस्थेऐवजी डेटा-आधारित आणि रिअल-टाईम निर्णय घेणारी स्मार्ट प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे.

या प्रकल्पातील महत्त्वाचा भाग म्हणजे अॅडॉप्टिव्ह ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम अर्थात ATCS. ही प्रणाली चौकांवरील वाहनांची संख्या आणि वाहतुकीची घनता ओळखून सिग्नलचा कालावधी आपोआप निश्चित करेल. त्यामुळे विनाकारण लाल सिग्नलवर थांबण्याची गरज कमी होऊन वाहतूक कोंडी आणि इंधनाचा अपव्ययही कमी होण्यास मदत होणार आहे.

या प्रकल्पाची अंमलबजावणी पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप अर्थात PPP तत्त्वावर केली जात असून नवी मुंबई महानगरपालिका किंवा शासनावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही. आवश्यक उपकरणांची उभारणी, चाचणी, संचालन आणि देखभाल याची संपूर्ण जबाबदारी खासगी भागीदार कंपनीकडे असेल.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता AI आधारित प्रणालीची करडी नजर असणार आहे. ऑटोमेटेड नंबर प्लेट रिकग्निशन म्हणजेच ANPR आणि रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्शन अर्थात RLVD प्रणालीच्या मदतीने सिग्नल तोडणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे आणि लेन शिस्तीचे उल्लंघन यांसारख्या प्रकारांची आपोआप नोंद केली जाणार आहे. व्हिडिओ आणि छायाचित्र पुराव्यांच्या आधारे ई-चलन प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविली जाईल.

आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना वाहतूक कोंडीतून तातडीने मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी या प्रणालीमध्ये ग्रीन कॉरिडॉरची विशेष सुविधा देण्यात आली आहे. केंद्रीकृत नियंत्रण कक्षातून आवश्यक मार्गावरील सिग्नलचे समन्वय साधून काही क्षणांत ग्रीन कॉरिडॉर निर्माण करता येणार आहे. त्यामुळे आपत्कालीन सेवांचा प्रतिसाद वेळ लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे.

याशिवाय, शहरातील 58 ठिकाणी व्हेरिएबल मेसेज डिस्प्ले म्हणजे VMD बोर्ड आणि पब्लिक अॅड्रेस प्रणाली बसविण्यात येणार आहे. वाहतूक बदल, पर्यायी मार्ग, हवामान इशारे, अपघात किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीची माहिती नागरिकांना तात्काळ उपलब्ध होणार आहे. नियंत्रण कक्षातून काही सेकंदांत संपूर्ण शहरात संदेश प्रसारित करण्याची सुविधा या प्रणालीत असणार आहे.

प्रकल्पाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून सुरुवातीला सर्वेक्षण, त्यानंतर उपकरणांची उभारणी, प्रणालीचे एकात्मिकरण आणि चाचणी, तसेच अंतिम टप्प्यात पूर्ण क्षमतेने कार्यान्वयन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थापन अधिक वेगवान, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित होईल, असा विश्वास प्रकल्प अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital