उपसभापती गणेशप्रसाद गवस यांचा वनविभागाला इशारा; नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
दोडामार्ग | सुहास देसाई
दोडामार्ग तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रानटी हत्तींच्या उपद्रवाचा प्रश्न अद्याप कायम असून, वनविभागाकडून या समस्येवर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
त्यातच सध्या 'ओमकार' नावाचा रानटी हत्ती मुख्य कळपापासून विभक्त होऊन थेट मानवी वस्त्यांमध्ये आणि गावागावांत मुक्तपणे फिरत असल्याने नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या गंभीर पार्श्वभूमीवर दोडामार्ग पंचायत समितीचे उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर जोरदार प्रहार केला आहे. 'वनविभागाने ओमकार हत्तीसोबत खेळणे थांबवावे आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने ठोस निर्णय घ्यावा,' अशी थेट मागणी त्यांनी केली आहे. वनविभाग हत्तीवर जे वेगवेगळे प्रयोग करत आहे ते थेट शेतकऱ्यांच्या मुळावर येत असून, 'मांजराचा खेळ होतोय पण उंदराचा जीव जातोय' असाच अनुभव सध्या नागरिक घेत असल्याचे गवस म्हणाले.
गावागावांत ओमकारचे फिरणे चिंताजनक
रानटी हत्तींचा नैसर्गिक अधिवास हा जंगल परिसर असताना ओमकार हत्ती सातत्याने मानवी वस्त्यांच्या आसपास फिरत असल्याचे दिसून येत आहे. गावांमध्ये, शेतीच्या परिसरात किंवा मानवी वर्दळ असलेल्या ठिकाणी हत्तीचा वावर वाढणे ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे गवस यांनी नमूद केले. 'गाव हा हत्तीचा नैसर्गिक अधिवास असू शकत नाही. आज तो शांत दिसत असला तरी वन्यप्राणी शेवटी वन्यप्राणीच असतो. भविष्यात कोणतीही बिकट परिस्थिती उद्भवण्यापूर्वी वनविभागाने वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य कळपापासून दूर असलेला ओमकार धोकादायक
ओमकार हत्ती मुख्य कळपापासून लांब असून, इतर हत्ती त्याला कळपात स्वीकारत नसतील तर ही परिस्थिती अधिकच धोकादायक बनू शकते, अशी भीती उपसभापती गवस यांनी व्यक्त केली. त्यामुळे या हत्तीच्या वर्तनाचा शास्त्रीय अभ्यास करून त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे, त्याचा अधिवास निश्चित करणे आणि त्याला मानवी वस्त्यांपासून दूर ठेवण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना आखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
'पकडू नये म्हणणाऱ्यांनी नुकसानाची जबाबदारी घ्यावी'
ओमकार हत्तीला पकडण्यास विरोध करणाऱ्यांवरही गवस यांनी कडक शब्दांत निशाणा साधला. 'ओमकारला पकडू नये, त्याला मोकळे सोडावे अशी भूमिका घेणाऱ्यांनी प्रत्यक्ष पुढे येऊन नागरिकांच्या होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी स्वीकारावी. वन्यप्राण्याबाबत भावनिक भूमिका घेणे वेगळे आणि स्थानिक नागरिकांच्या जीविताची जबाबदारी सांभाळणे वेगळे आहे,' असा टोला त्यांनी लगावला. हत्तीमुळे भविष्यात एखाद्या नागरिकाच्या घराचे, शेतीचे नुकसान झाले किंवा एखादी अप्रिय घटना घडली तर त्याची जबाबदारी वनविभाग वा हे विरोधक घेणार का, असा रोखठोक सवालही त्यांनी उपस्थित केला.
वनविभागाच्या तात्पुरत्या उपायांवर प्रश्नचिन्ह
तालुक्यात हत्ती केवळ गावात आल्यावर त्याला हुसकावून लावणे किंवा तात्पुरती गस्त घालणे यावर प्रश्न सुटणारा नाही. हत्तींच्या हालचालींचे शास्त्रीय व्यवस्थापन, संवेदनशील गावांमध्ये पूर्वसूचना यंत्रणा आणि नागरिकांच्या कायमस्वरूपी सुरक्षेसाठी ठोस कृती आराखड्याची गरज व्यक्त केली जात आहे.
तातडीने निर्णय घेण्याची मागणी
ओमकार हत्तीच्या बाबतीत केवळ बघ्याची भूमिका न घेता, तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याला पकडणे, स्थलांतरित करणे किंवा सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडणे याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. 'हत्तीच्या जीवाला धोका निर्माण करणे हा आमचा उद्देश नाही; मात्र नागरिकांचा जीवही तितकाच मोलाचा आहे. त्यामुळे वनविभागाने आता कोणतीही हलगर्जी न करता ठोस भूमिका घ्यावी,' असा इशारा गणेशप्रसाद गवस यांनी दिला आहे.

