Dailyhunt
पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचा सुवर्ण महोत्सव सांगता सोहळा उत्साहात संपन्न

पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचा सुवर्ण महोत्सव सांगता सोहळा उत्साहात संपन्न

शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीतून पाच पिढ्या घडविण्याचे आदर्श कार्य; मान्यवरांकडून गौरव

दोडामार्ग सुहास देसाई

पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ, मुंबई यांनी गेली ५० वर्षे सातत्य, कठोर परिश्रम आणि सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्याचा 'सुवर्ण महोत्सव सांगता सोहळा' अत्यंत उत्साहात पार पडला.

वर्षभर विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आलेल्या या महोत्सवाने मंडळाच्या कार्याचा ठसा अधिक दृढ केला असून, ग्रामीण विकासाचा एक प्रेरणादायी इतिहास घडविला आहे.

शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे येथे आयोजित या दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन नवी मुंबईचे नगरसेवक प्रदीप गवस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, ज्येष्ठ संपादक शेखर सामंत आणि गावचे सुपुत्र तथा माजी प्रशासकीय अधिकारी मोहन गवस यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मंचावर भाजपा तालुकाध्यक्ष तथा जि. प. सदस्य दिपक गवस मुबंई मंडळ अध्यक्ष बबन उर्फ सावळाराम गवस, सचिव प्रमोद गवस, खजिनदार रमाकांत गवस, मुख्याध्यापक अशोक आंबुलकर, समन्वय समिती सहसचिव तथा प्राचार्य भेडशी प्रशाला नंदकुमार नाईक,पिकुळे सरपंच आपा गवस, झरेबांबर सरपंच अनिल शेटकर,पंचायत समिती सदस्या , स्नेहा गवस आदी मान्यवर उपस्थित होते.

*सुवर्ण महोत्सव म्हणजे नवी सुरुवात : मोहन गवस*

याप्रसंगी बोलताना मोहन गवस म्हणाले की, 'हा सुवर्ण महोत्सव म्हणजे कार्याचा शेवट नसून हिरक महोत्सवाच्या दिशेने झालेली नवी सुरुवात आहे. आपण कितीही मोठे झालो तरी गावाशी असलेली नाळ आणि मातीचा सुगंध जपणे आवश्यक आहे.' मंडळाच्या भावी वाटचालीस त्यांनी सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.

*गुणवत्तेला ग्रामीण-शहरी असा भेद नसतो : शेखर सामंत*

संपादक शेखर सामंत यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की, गुणवत्ता सर्वत्र असते. 'ग्रामीण भागातून पुढे येऊन मोहन गवस आणि प्रदीप गवस यांनी मिळवलेले यश विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहे. मंदिर उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये मिळतात, मात्र विद्यामंदिर (शाळा) उभारण्यासाठी कार्य करणारे हे मंडळ खरोखरच वंदनीय आहे,' अशा शब्दांत त्यांनी मंडळाचा गौरव केला.

*पाच पिढ्या घडविणारे योगदान : विजय काळे*

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी शाळेच्या आणि मंडळाच्या योगदानाचे कौतुक करताना सांगितले की, या संस्थेने केवळ शिक्षण दिले नाही, तर समाजाच्या पाच पिढ्या घडविण्याचे मोलाचे कार्य केले आहे.

शाळेसाठी ५० हजारांची देणगी

या मंगलप्रसंगी प्रियांका प्रकाश तळेकर (सेवानिवृत्त अधीक्षक, पोलीस आयुक्तालय मुंबई) यांनी आपले आजोबा कै. लक्ष्मण भिवा गवस यांच्या स्मरणार्थ शाळेच्या दुरुस्तीसाठी ५० हजार रुपयांची देणगी जाहीर केली. १ मे रोजी हा धनादेश मंडळाकडे सुपूर्द करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा संदीप गवस यांनी केले. प्रास्ताविक सचिव प्रमोद गवस यांनी मांडले, तर अध्यक्ष सावळाराम गवस यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital