महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या प्रमुख उपस्थितीत झाला सन्मान राजापूर प्रतिनिधी : महसुल प्रशासनात काम करताना कोकण विभागात जनतेच्या हितासाठी उत्कृष्ट सेवा देतानाच महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, लोकाभिमुख व परिणामकारक करण्यासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राजापूर तालुक्यातील पेंडखळे- भू सजाच्या ग्राम महसूल अधिकारी हर्षुला बोरसा उर्फ हर्षदा शिवलकर यांचा राज्याचे महसुल मंत्री ना.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन विशेष गौरव करण्यात आला आहे.
रायगड जिल्हयात अलीबाग येथे महसुल दिनी झालेल्या कार्यक्रमात हर्षुला बोरसा उर्फ हर्षदा शिवलकर यांना मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
महसुल प्रशासनाच्या कोकण महसुल विभागात रत्नागिरी जिल्ह्यातील सात महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महसूल दिनानिमित्त गौरव करण्यात आला. या पुरस्कार प्राप्त मानकऱ्यांमध्ये आकाश लिंगाडे (उपविभागीय अधिकारी, चिपळूण), अनिल गोसावी (निवासी नायब तहसीलदार, लांजा), संतोष पांचाळ (मंडळ अधिकारी, लांजा), राजापूर तालुक्यातील पेंडखळे- भू सजाच्या ग्राम महसूल अधिकारी हर्षुला बोरसा उर्फ हर्षदा शिवलकर बी. एम. दोनकट्टी (लघुलेखक - उच्चश्रेणी, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी), नंदकुमार कदम (वाहनचालक, तहसीलदार कार्यालय, संगमेश्वर) आणि राहुल महानकर (महसूल सेवक, मंडणगड) यांचा समावेश आहे.
राजापूरच्या पेंडखळे- भू सजाच्या ग्राम महसूल अधिकारी हर्षुला बोरसा उर्फ हर्षदा शिवलकर या सन २०११ पासून महसूल प्रशासनाच्या सेवेत आहेत. त्यांनी राजापूर तालुक्यात विविध सजांमध्ये ग्राममहसुल अधिकारी म्हणून अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. तर दोन वर्षे त्यांनी लांजा तालुक्यातही काम केले. एक कार्यतत्पर महिला अधिकारी म्हणुन त्यांची ओळख आहे. त्यांनी ज्या ज्या गावांमध्ये काम केले तेथे सर्वसामान्य जनतेच्या कामांचा त्यांनी तात्काळ निपटारा करत जनतेला दिलासा दिलाच पण महसुल प्रशासनाची शान वाढविली आहे. त्यांच्या उत्कृष्ठ कामाची दखल घेत यापुर्वीही त्यांना तालुका व जिल्हा पातळीवर गौरविण्यात आले आहे. त्यांचा सन २०१५-१६, २०१६-१७, २०१८-१९ व २०२३-२४ असा सलग चार वेळा शासनाकडून त्यांचा गौरव झालेला आहे.
त्यांच्या याच चांगल्या कार्यपध्दतीची दखल घेत कोकण विभागिय स्तरावर त्यांचा सर्वोत्कृष्ठ ग्राममहसुल अधिकारी म्हणून गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच महसुल प्रशासनात तसेच राजापूर तालुक्यात अभिनंदन होत आहे.

