रत्नागिरी : भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालय व भारतीय टपाल विभाग यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेले राजापूर येथील पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (POPSK) हे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त व नागरिकाभिमुख सुविधा केंद्र ठरत आहे.
या केंद्रामुळे कोकणातील नागरिकांना पासपोर्ट सेवांसाठी मुंबई अथवा इतर महानगरांमध्ये वारंवार जावे लागत नसून वेळ, खर्च आणि श्रमांची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे.
राजापूर पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये पासपोर्ट अर्ज स्वीकृती, दस्तऐवज पडताळणी, बायोमेट्रिक नोंदणी तसेच इतर प्राथमिक प्रक्रिया सुलभ व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येतात. केंद्राच्या कार्यक्षम सेवेमुळे विद्यार्थी, परदेशात शिक्षण किंवा रोजगारासाठी जाणारे युवक, व्यावसायिक, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ होत आहे.
सध्या या केंद्रामध्ये दररोज सरासरी ४५ ते ४८ पासपोर्ट अर्जांची नोंदणी केली जाते, तर दरमहा सुमारे ४०० हून अधिक पोलीस पडताळणी प्रकरणांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. आजपर्यंत राजापूर पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रामार्फत सुमारे ५३,२२५ नागरिकांनी पासपोर्ट सेवांचा लाभ घेतला असून केंद्राच्या कार्यक्षमतेबाबत समाधान व्यक्त केले आहे.
पूर्वी पासपोर्ट प्रक्रियेसाठी नागरिकांना मुंबईसारख्या शहरांमध्ये जाऊन अनेक फेऱ्या माराव्या लागत होत्या. यामध्ये आर्थिक खर्चाबरोबरच वेळेचाही मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असे. मात्र, ही सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्यामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही सेवा अत्यंत सोयीची व परिणामकारक ठरत आहे.
भारतीय टपाल विभागामार्फत नागरिकांना अधिक सुलभ, आधुनिक, पारदर्शक व विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. राजापूर पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र ही त्याच दिशेने उचललेली एक महत्त्वपूर्ण पायरी असल्याचे मत श्री. ज्ञानेश कुलकर्णी, अधीक्षक डाकघर, रत्नागिरी विभाग यांनी व्यक्त केले. तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा?
पासपोर्ट अर्ज प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन व सुलभ करण्यात आली आहे. नागरिकांनी खालील टप्प्यांनुसार अर्ज करावा :
१. अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करा
Passport Seva Portal
या संकेतस्थळावर जाऊन नवीन वापरकर्ता (New User Registration) नोंदणी करावी.
२. लॉगिन करून अर्ज भरा
* 'Apply for Fresh Passport / Reissue Passport' हा पर्याय निवडा.
* आवश्यक वैयक्तिक माहिती अचूक भरावी.
* ऑनलाइन फॉर्म भरता येतो किंवा PDF फॉर्म डाउनलोड करून अपलोड करता येतो.
३. शुल्क भरून अपॉइंटमेंट घ्या
* अर्ज पूर्ण झाल्यानंतर ऑनलाइन शुल्क भरावे.
* त्यानंतर जवळचे Passport Seva Kendra / POPSK निवडून अपॉइंटमेंट निश्चित करावी.
* रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी राजापूर POPSK उपलब्ध आहे.
४. आवश्यक कागदपत्रांसह केंद्राला भेट द्या
अपॉइंटमेंटच्या दिवशी मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे. सामान्यतः खालील कागदपत्रांची आवश्यकता असते :
* आधार कार्ड (DigiLocker App मध्ये उपलब्ध असावे)
* मतदान ओळखपत्र / पॅन कार्ड
* रहिवासी पुरावा
* जन्मतारीख पुरावा
* जुना पासपोर्ट (असल्यास)
५. बायोमेट्रिक व पडताळणी प्रक्रिया
केंद्रामध्ये खालील प्रक्रिया पूर्ण केली जाते :
* फोटो
* बोटांचे ठसे
* दस्तऐवज पडताळणी
६. पोलीस पडताळणी
अर्जानंतर स्थानिक पोलीस पडताळणी केली जाते.
७. पासपोर्ट घरपोच प्राप्त
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पासपोर्ट स्पीड पोस्टद्वारे घरच्या पत्त्यावर पाठविला जातो.
महत्त्वाच्या सूचना
* अर्जामधील माहिती व कागदपत्रे अचूक असावीत.
* अपॉइंटमेंट वेळेपूर्वी केंद्रात उपस्थित राहावे.
* अधिकृत संकेतस्थळाशिवाय इतर अनधिकृत एजंट्सपासून सावध राहावे.
अधिक माहितीसाठी संपर्क
* पोस्टमास्तर, राजापूर पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (POPSK)
* अधीक्षक डाकघर, रत्नागिरी विभाग, गोगटे-जोगळेकर कॉलेजजवळ, रत्नागिरी
* प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, विदेश भवन, जी-ब्लॉक, वांद्रे-कुर्ला संकुल (BKC), मुंबई - ४०००५१
दूरध्वनी : ०२२-२६५२००१६ / १७
ई-मेल : [email protected]
