Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राजापुरातील नाणार, कुंभवडे, सागवे परिसरात प्रस्तावित बॉक्साइट खनिज उत्खनन प्रकल्पाची जनसुनावणी रद्द

राजापुरातील नाणार, कुंभवडे, सागवे परिसरात प्रस्तावित बॉक्साइट खनिज उत्खनन प्रकल्पाची जनसुनावणी रद्द

राजापूर । प्रतिनिधी : तालुक्यात नाणार, कुंभवडे, सागवे परिसरात होऊ घातलेल्या बॉक्साइट खनिज उत्खनन प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध असल्याची जाणीव आपणाला आहे. स्थानिक आमदार किरण सामंत हे देखील जनतेसोबत असून त्यांनीही या प्रकल्पाला ठाम विरोध केलेला आहे.

त्यामुळे या प्रकल्पाची सोमवारी ७ सप्टेंबर रोजी होणारी जनसुनावणी होणार नाही ती रद्द केली जाईल अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दिली. तर या प्रकल्पाबाबत जे स्थानिक जनतेच्या मनात आहे तसेच होईल तुंम्ही निश्चिंत रहा असा शब्दही ना. सामंत यांनी यावेळी जनतेला यावेळी दिला.

तालुक्यात नाणार, कुंभवडे, सागवे परिसरात होऊ घातलेल्या बॉक्साइट खनिज उत्खनन प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून ७ सप्टेंबर रोजी जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमिवर या प्रकल्पाला तीव्र विरोध करण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत व राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत रविवारी सागवे येथे सर्वपक्षिय प्रकल्पविरोधी संघर्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नारायण गणेश कुलकर्णी विद्यानिकेतन सागवे हायस्कुल येथे ही सभा झाली. याप्रसंगी ना. सामंत बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार किरण सामंत, सभापती नंदीनी कदम, तालुका प्रमुख दिपक नागले, उबाठाचे तालुका प्रमुख कमालकर कदम, एड. शशिकांत सुतार यांसह सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच या पंचक्रोशीतील सरपंच उपस्थित होते.
या संघर्ष मेळाव्यात मच्छीमार, शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रकल्पाला जनतेचा विरोध लक्षात घेऊन सोमवारी ७ सप्टेंबर रोजी नियोजित असलेली बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी होणार नाही, असे स्पष्ट आश्वासन ना. सामंत यांनी यावेळी दिले. अनेकजणांनी भाषणात माझा उलेख हा संकट मोचक असा केला आहे, हा धागा पडकून ना. सामंत म्हणाले जर मी राज्याचा संकट मोचक असेन तर मग आपल्या जिल्ह्यावर संकट येणार नाही, याची खात्री तुम्हाला असायला हवी असे नमुद करत तुमच्या मनात जे आहे तेच होईल अशी ग्वाही दिली. तर स्थानिक आमदार म्हणून आ. किरण सामंत यांचा जर का विरोध आहे, ते तुमच्या सोबत आहेत तशी भूमिका त्यांनी मांडली आहे. तर पालकमंत्री म्हणून मी शासनाची प्रतिनिधी म्हणून भूमिका मांडण्यासाठी आलो आहे, त्यामुळे तुंम्ही निश्चिंत रहा, ७ तारखेची जनसुनावणी होणार नाही, आणि प्रकल्पाबाबतही जे तुमच्या मनात आहे तेच हाईल असा शब्दही ना. सामंत यांनी यावेळी दिला. एखाद्या प्रकल्पासाठी संघर्ष करण्याची वेळ भविष्यात कोणावरही येणार नाही, जबरदस्तीने कुठेही काही होणार नाही. जनतेला जे हवे आहे, ते करण्याची आमची आणि सरकारची भूमिका आहे. मी सरकारमध्ये असलो तरी जनतेशी बांधील आहे. आम्हीही याच मातीतले आहोत. त्यामुळे कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नाही,' असे ना. सामंत यांनी ठामपणे सांगितले. या प्रकल्पाबाबत आपण कंपनीच्या मालकाशीही बोललो असून त्यांनाच या ठिकाणी आता प्रकल्प करण्यात स्वारस्य नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे तुंम्ही निश्चिंत रहा असेही ना. सामंत यांनी यावेळी सांगितले.
कोकणात नव्याने विविध प्रकारचे सुमारे २००० कोटींच्या प्रकल्प येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कोकणात भविष्यात पर्यावरण पुरक प्रकल्प आणले जातील त्यांचेही आपण स्वागत केले पाहिजे असेही ना. सामंत यांनी यावेळी नमुद केले. याबाबत आजच झालेल्या उद्योजकांच्या बैठकीतही मी ही भूमिका मांडल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. तर बचत गटांच्या माध्यमातून काजू बोंडापासून सिरप निर्मितीसारख्या स्थानिक आणि शाश्वत उद्योगांना चालना देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच 'लाडकी बहीण' योजना कधीही बंद होणार नाही, कोणत्याही अपप्रचाराला बळी पडून नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रकल्पाला आमचाही विरोधच, आपण स्थानिक जनतेसोबतच पण थोडे सबुरीनही घेणे आवश्यक- आ. किरण सामंत
याप्रसंगी बोलताना आ. किरण सामंत यांनी आपण कायमच माझ्या मतदार संघातील जनतेसोबत असल्याचे नमुद केले. मला कोणतेही राजकारण करणे आवडत नाही, आपली भूमिका ही रोखठोक असते, त्यामुळे कुणी राजकारण करत असेल तर त्याला बळी पडू नका. आज पालकमंत्र्यांच्या व्यस्त कार्यक्रमातुन वेळ काढून त्यांना आणले आहे ते माझ्या जनतेसाठीच. कोणतेही काम असो त्याची पुर्तता व्हायला थोडा वेळ लागतो. कुणीही आले म्हणजे लगेच झेरॉक्स कॉपी काढली पटकन असे काम होत नाही, त्यासाठी थोडा धीर धरावा लागतो असेही आ. सामंत यांनी नमुद केले. आपल्या या संघर्षाला आणि संघर्ष मेळाव्याला नक्की यश मिळेल, काही गोष्टी टप्प्याटप्प्याने कराव्या लागतात हे देखील लक्षात ठेवा. पालकमंत्री हे नक्कीच आमच्या मागणीचा विचार करून तुंम्हाला जे हवे आहे तसा निर्णय घेतील अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी प्रास्ताविकात एड. शशिकांत सुतार यांनी या मेळाव्याच्या आयोजनाबाबत माहिती दिली. या प्रकल्पामुळे जनतेला काय परिणाम भोगावे लागतील याबाबतही विस्तृत भूमिका मांडली. तर नाणारचे माजी सरपंच ओंकार प्रभूदेसाई यांनीही आ. किरण सामंत यांनी घेतलेली जनतेची बाजू भक्कम पाठबळ निश्चितच आंम्हाला प्रेरणा देणारे असून हा प्रकल्प आंम्हाला नकोच अशी ठाम भूमिका मांडली. तर नाणारचे माजी सरपंच मजीद भाटकर यांनी मच्छीमारही या प्रकल्प विरोधासाठी एकजुटीने उभे आहेत. स्थानिक जमिन मालक शेतकऱ्यांनी आंम्ही आमच्या जमिनी या प्रकल्पाला देणार नाही अशी शपथपत्र केल्यानंतर मच्छीमार समाज एकदिलाने या संघर्षात सहभागी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर निमेष वालम यांनी आपल्याला कोणते प्रकल्प हवेत, भविष्यात तालुक्यात कोणते प्रकल्प आले पाहिजेत याची यादी तयार केली पाहिजे व असे प्रकल्प आपल्या लोकप्रतिनिधींमार्फत आणले पाहिजेत अशी भूमिका मांडली. यावेळी उबाठा तालुका प्रमुख कमलाकर कदम. शिवसेना तालुका प्रमुख दिपक नागले, जिल्हा परिषद सदस्या सोनाली ठुकरूल,. संजय राणे, सुबोध मांजरेकर, काशिनाथ गोरले, नंदकुमार कुलकर्णी, वासुदेव मासये, रवींद्र अवसरे, मनोहर धुरी, समिर अवसरे आदींनी आपले विचार मांडत या बॉक्साईट प्रकल्पाला ठाम विरोध दर्शविला या मेळाव्याला स्थानिक शेतकरी, बागायदार, मच्छीमार, सामाजिक कार्यकर्ते तसेच रवींद्र नागरेकर, अशफाक हाजू, राजू कुरूप, अमोल बोळे यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकल्प विरोधी संघर्ष मेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणिय होती.
बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनाणी तिसऱ्यांदा रद्द
राजापूत तालुक्यात नाणार, कुंभवडे, सागवे परिसरात होऊ घातलेल्या बॉक्साइट खनिज उत्खनन प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. आता रविवारच्या सभेत पालकमंत्री ना. सामंत यांनी ७ सप्टेंबरची जनसुनावणी रद्दची घोषणा केली आहे. त्यामुळे आता तिसऱ्यांदा या प्रकल्पाची जनसुनावणी रद्द झाली आहे. यापुर्वी दोन वेळा या प्रकल्पाची जनसुनावणी रद्द झाली होती. सन २०१७ ते १८ पासून या भागात या प्रकल्पाची चर्चा आहे. त्यामुळे आता तिसऱ्यांदा जनसुनावणी रद्द झाली आहे., आता हा प्रकल्प रद्द होणार की कसे काय याबाबत जनतेला उत्सुकता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital