..
उत्कृष्ट कामगिरीमुळे गोवा व पंजाब येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड
वेंगुर्ले : दाजी नाईक
मुंबई वरळी येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र एअर अँड फायरआर्म कॉम्पिटिशन या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील सुभाष बोवलेकर यांनी चमकदार कामगिरी केली आहे.
त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची गोवा व पंजाब येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
उपरकर शूटिंग अकॅडमी तर्फे सहभागी झालेले मठ वेंगुर्ले येथील श्री. सुभाष चंद्रकांत बोरलेकर यांनी ५० मीटर .२२ रायफल प्रोन प्रकारात सहभाग घेऊन ६०० पैकी ५२५ गुण मिळवून पाचवा क्रमांक प्राप्त केला. तसेच या पूर्वी मुंबई येथेच झालेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत श्री. बोरलेकर यांचा चिरंजीव कु. प्रतीक याने याच इव्हेंटमध्ये सहभाग घेऊन चौथा क्रमांक पटकाविला होता. या दोघांची गोवा येथे होणाऱ्या बेस्ट झोन शूटिंग चॅम्पियनशिप व पंजाब, मोहाली येथे होणाऱ्या ऑल इंडिया जी.व्ही. मावळणकर शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा यासाठी निवड झाली आहे. सदरचे खेळाडू उपरकर शूटिंग अकॅडमी वेंगुर्ले येथे सराव करत असून त्यांनी .२२ प्रोन प्रकारचा सराव रत्नागिरी येथे केला. त्यांना उपरकर शूटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक श्री. कांचन उपरकर, रत्नागिरीचे प्रशिक्षक श्री. पुष्कराज इंगोले तसेच अँड. श्री. विक्रम भांगले यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या दोन्ही खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. श्री.बोवलेकर यांचे वेंगुर्ले तालुक्यातूनही अभिनंदन होत आहे.

