सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अव्वल मानांकित आणि सावंतवाडीतील युवा राष्ट्रीय बुद्धिबळपटू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
नवनियुक्त सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री. अरविंद मोंडकर यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन बाळकृष्णला सन्मानित करण्यात आले. जिल्हा काँग्रेस आणि सावंतवाडी तालुका काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याला जिल्ह्यातील अनेक प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये ज्येष्ठ नेते ॲड. दिलीप नार्वेकर, प्रदेश सरचिटणीस साईनाथ चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, प्रदेश सेवादल अध्यक्ष अजिंक्य गावडे, युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, ओबीसी सचिव अमिदी मेस्त्री, तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, तसेच रवींद्र म्हापसेकर, राजू मसुरकर आणि नागेश मोरये आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी बाळकृष्णच्या यशाचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बाळकृष्णला शुभेच्छा देताना जिल्हाध्यक्ष श्री. अरविंद मोंडकर म्हणाले की, 'बाळकृष्णने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले यश अत्यंत वाखाणण्याजोगे आहे. त्याची ही कामगिरी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भूषणावह आहे.' याच धर्तीवर, आगामी काळात जिल्ह्यातील मुलांसाठी खेळाच्या माध्यमातून विविध उपक्रम आणि सोयी-सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
कार्यक्रमादरम्यान बाळकृष्णचे वडील श्री. कौस्तुभ पेडणेकर यांनी बाळकृष्णच्या गेल्या १० वर्षांतील बुद्धिबळ प्रवासावर प्रकाश टाकला. त्याने जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा प्रकारे यश संपादन केले, याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. मुलांच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी आणि इतर उपक्रम राबवण्यासाठी श्री. कौस्तुभ पेडणेकर हे 'मुक्ताई ॲकेडमी' चालवतात. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कार्याचे आणि ॲकेडमीचे देखील श्री. अरविंद मोंडकर यांनी विशेष कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमात बाळकृष्णवर कौतुकाचा वर्षाव झाला असून, सर्वच स्तरातून त्याच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत

