संतोष कोत्रे लांजा -: गावा गावांना - वाडी वस्त्यांना जोडण्यासाठी डांबरी रस्ते तयार केले जातात. तर या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो.
मात्र दुरुस्तीनंतर काही दिवसातच, महिन्यातच पुन्हा रस्ते नादुरुस्तर बनतात. लांजा साटवली या सागरी मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी तब्बल ३५ लाख रुपये खर्च करूनही अवघ्या दोन महिन्यातच पुन्हा खड्डे पडले आहेत. याची पोलखोल कोंडये ग्रामपंचायतीच्या सरपंचांनीच केली आहे. अशा प्रकारचे अनेक रस्त्यांची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे ही रस्ते दुरुस्ती होती की नुसता फार्स? आणि रस्त्यांची दुरुस्ती ही वाहनचालक, ग्रामस्थांसाठी की ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या हितासाठी केली जाते? असा सवाल या निमित्ताने पुढे आला आहे.
लांजा तालुका हा पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागला गेला आहे. तालुक्यातील १२४ गावांना आणि येथील वाड्या वस्त्यांना जोडणारे अनेक रस्ते देखील तयार झालेले आहेत. मात्र अनेक रस्त्यांची अवस्था बिकट आहे. डांबरीकरण झाल्यानंतर अनेक रस्ते हे वर्षभरातच नादुरुस्त बनतात. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होते. आणि या रस्त्यांवरून चालताना ग्रामस्थांची, वाहन चालकांची मोठी गैरसोय होते. येथील ग्रामस्थांकडून सातत्याने मागणी करूनही संबंधित प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होते आणि परिणामी वर्षानुवर्षे हे रस्ते नादुरुस्तच राहतात. (उदाहरण द्यायचे म्हटले तर गवाणे कोलध्ये कोट रस्ता)
अशाच प्रकारे लांजा साटवली या सागरी मार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी थोडे थोडके नव्हे तर तब्बल ३५ लाख रुपये खर्च करण्यात आले. आणि त्यानंतर अवघ्या दोनच महिन्यात बुजवलेले खड्डे पूर्ववत दिसू लागले. ही बाब एक जागरूक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी म्हणून कोंड्ये ग्रामपंचायतचे सरपंच मनोज चंदुरकर यांनी उघडकीस आणली आणि यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराचा नमुना समोर आला. आम जनतेचे लाखो रुपये खर्च करून बुजवलेले खड्डे जर दोन महिन्यात पुन्हा पूर्वीसारखे होत असतील तर तर त्या कामाच्या दर्जा काय? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. म्हणजेच खड्डे बुजवण्यासाठी खर्च केलेले लाखो रुपये अक्षरशः वाया गेले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. खड्ड्यांची दुरुस्ती नेमकी कोणासाठी? वाहन चालक, प्रवासी ? की ठेकेदार, अधिकारी यांच्यासाठी? हा प्रश्न या निमित्ताने प्रकर्षाने पुढे आला आहे.
तालुक्यात दरवर्षी अशा प्रकारे लाखो रुपयांचा निधी हा रस्ते दुरुस्ती, खड्डे भरणे यासाठी केला जातो. मात्र या निधीतून खरोखरच चांगल्या दर्जाची कामे होतात का? असाही प्रश्न आहे. कोंड्ये सरपंच मनोज चंदुरकर यांच्यामुळे साटवली रस्त्यावरील ३५ लाख रुपये वाया गेल्याची बाब उघडकीस आली. मात्र तालुक्यात अशा अनेक रस्त्यांवर दरवर्षी खड्डे भरणे दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्ची पडतो. त्यातून किती चांगल्या दर्जाची कामे होतात? किती रस्ते वर्षभर चांगल्या स्थितीत राहतात ? हा संशोधनाचा विषय आहे. मात्र अशीच कामे होत राहिली तर मात्र जनतेच्या पैशाचा हा नाहक अपव्यय होत नाही का?
ऐन दोन- महिन्यांत पुन्हा डागडुजी करण्याची वेळ जर येत असेल तर सार्वजनिक निधीचा हा योग्य वापर आहे का? आणि या निकृष्ट कामाची जबाबदारी नेमकी कोणाची? असा संतप्त सवाल जनतेतून केला जात आहे.
म्हणूनच तालुक्यात रस्ते दुरुस्ती, खड्डे भरणे रस्त्यांचे डांबरीकरण ही कामे चांगल्या दर्जाची झाली पाहिजेत, यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा देखील अंकुश राहिला पाहिजे. प्रत्येक काम हे किमान वर्षभर तरी चांगले टिकले पाहिजे यावर बांधकाम विभागाचा कटाक्ष असावा. रास्त अपेक्षा तालुक्यातील जनतेची आहे. आगामी काळात तरी यावर बांधकाम विभाग जाणीवपूर्वक लक्ष देऊन काम करणार का? हा प्रश्नच आहे.

