रत्नागिरी : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अवैध शस्त्रांच्या बेकायदेशीर वापराला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी विशेष मोहीम राबवत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
पोलिस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत ५ गुन्हे उघडकीस आले असून ८ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
सन २०२६ मध्ये अवैध शस्त्रे बाळगणे आणि वापरणे यासंदर्भातील पाच प्रकरणांची नोंद करण्यात आली होती. या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी माहिती संकलन, छापेमारी आणि तपासाच्या माध्यमातून यशस्वी कारवाई केली. कारवाईदरम्यान ८ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात भारतीय हत्यार अधिनियम १९५९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच संबंधित आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली आहे.
या मोहिमेत आरोपींकडून एकूण ७ अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली. त्यामध्ये ५ सिंगल बॅरल काडतुसी बंदुका, १ ठासणीची बंदूक आणि १ लोखंडी गावठी कट्टा यांचा समावेश आहे. याशिवाय २९ जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली असून संभाव्य गंभीर गुन्हे घडण्यापूर्वीच त्यांना प्रतिबंध घालण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत एकूण २ लाख २८ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध शस्त्रांविरोधातील कठोर धोरण भविष्यातही कायम ठेवत विशेष मोहिमा, छापेमारी आणि प्रतिबंधात्मक कारवाया अधिक प्रभावीपणे राबविण्यात येतील, असे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्पष्ट केले आहे.
• रत्नागिरी पोलिसांची अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहीम
• ५ गुन्हे उघडकीस; ८ आरोपींवर कारवाई
• ७ अवैध शस्त्रे आणि २९ जिवंत काडतुसे जप्त
• २.२८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
• गंभीर गुन्हे रोखण्यात पोलिसांना यश

