Dailyhunt
रत्नागिरीत पर्यटकांना अडवून मारहाण: आरे-वारे येथील धक्कादायक प्रकार; ४ अज्ञातांवर गुन्हा दाखल

रत्नागिरीत पर्यटकांना अडवून मारहाण: आरे-वारे येथील धक्कादायक प्रकार; ४ अज्ञातांवर गुन्हा दाखल

रत्‍नागिरी ः प्रतिनिधी

मुंबईहून रत्‍नागिरीत फिरण्यासाठी आलेल्या पर्यटक कुटुंबियाच्या गाडीसमोर दोन गाड्या आडव्या लावून त्‍यांना मारहाण व शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवार 2 मे रोजी सायंकाळी 5 वा.सुमारास आरे-वारे येथे घडली आहे.

या प्रकरणी चार अज्ञातांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्‍यांच्या विरोधात प्रविण हरिश्चंद्र कोरे (48,रा.मीठाघर रोड कांदरपाडा दहिसर पश्चिम मुंबई) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यानुसार, प्रविण कोरे हे आपल्या कुंटुंबियांसह रत्‍नागिरीतील आरेवारे येथे जात होते. त्‍यावेळी कार नंबर (एमएच-46-डीए-9784) आणि कार नंबर (एमएच-46-सीई-7485) मधील चार अज्ञातांनी फिर्यादीच्या गाडीसमोर आपल्या गाड्या वाकड्या तिकड्या चालवून त्‍यांना पुढे जाण्यासाठी अडथळा केला.

त्‍यानंतर त्‍या चार अज्ञातांनी फिर्यादी आणि त्‍यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याबाबत फिर्यादींनी त्‍यांना तुम्ही शिवीगाळ का करता असा जाब विचारला असता त्‍याचा राग आल्याने संशयितांनी फिर्यादीच्या डोक्याच्या डाव्या बाजुला,डाव्या कानावर आणि डाव्या हातावर बुक्क्याने मारुन दुखापत केली. त्‍यानंतर फिर्यादीच्या पत्‍नीला धक्काबुक्की करत त्‍यातील एकाने चाकू काढून अंगावर धावून गेला. फिर्यादीच्या भावाला आणि पुतण्यालाही मारहाण केली. या झटापटीत फिर्यादीच्या गळ्यातील सहा ग्रॅमची सोन्याची चेन व त्‍यामध्ये असलेली नउ ग्रॅम वजनाची चांदीची अंगठी पडून नुकसान झाले आहे. त्‍यानंतर संशयितांनी काहीवेळ फिर्यादीच्या गाडीचा पाठलाग करुन निघून जाताना तुमच्या गाडीचा नंबर आम्ही बघितला आहे तुम्हाला शोधून ठार मारतो अशी धमकीही दिली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital