Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सदानंद चव्हाणांनाच विधान परिषदेची उमेदवारी द्या! चिपळुणातील शिवसैनिकांचा एल्गार

सदानंद चव्हाणांनाच विधान परिषदेची उमेदवारी द्या! चिपळुणातील शिवसैनिकांचा एल्गार

चिपळूण (प्रतिनिधी) : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमधील शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले असून माजी आमदार सदानंद चव्हाण यांनाच महायुतीची उमेदवारी द्यावी, अशी ठाम आणि एकमुखी मागणी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली.

यासाठी चिपळूणमधील असंख्य शिवसैनिक, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी पाली येथे जाऊन सामंत यांची भेट घेतली.
महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या उमेदवाराबाबत चर्चांना वेग आला आहे. अशा परिस्थितीत चिपळूणमधील शिवसैनिकांनी सदानंद चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपली भूमिका स्पष्ट केली. कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले की, आ. भास्कर जाधव यांनी शिवसेना सोडल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात पक्ष संघटना उभी करण्याचे आणि मजबूत करण्याचे मोठे काम सदानंद चव्हाण यांनी केले. चिपळूणसह संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी त्यांनी सातत्याने परिश्रम घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला नवसंजीवनी मिळाली आणि ते दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले. मागील विधानसभा निवडणुकीतही त्यांनी तगडी लढत देत अत्यल्प मतांच्या फरकाने पराभव स्वीकारला. पक्षासाठी आयुष्यभर निष्ठेने काम करणाऱ्या आणि संघटना वाढविण्यासाठी योगदान देणाऱ्या सदानंद चव्हाण यांनाच विधान परिषदेची संधी मिळाली पाहिजे, अशी भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तसेच चिपळूण आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या भावना लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावाचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली.
या भेटीवेळी आमदार भैय्या सामंत, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, शिवसेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, नगरसेवक, माजी नगरसेवक तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मोठ्या संख्येने झालेल्या या उपस्थितीमुळे सदानंद चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी शिवसैनिकांमध्ये असलेला उत्साह आणि पाठिंबा अधोरेखित झाला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या शक्तिप्रदर्शनामुळे जिल्ह्यातील राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital