Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
संगमेश्वर तालुक्यातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार?

संगमेश्वर तालुक्यातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार?

देवरूख (प्रतिनिधी):

संगमेश्वर तालुक्यात अवकाळी पाऊस व हवामानातील बदलांमुळे आंबा व काजू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलेल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांवर आता प्रशासकीय अनास्थेमुळे नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची वेळ येते कि काय?

असे चित्र निर्माण झाले आहे.

याचे कारण पंचायत समितीच्या कृषी विभागाने जून महिन्यातच तालुक्यातील तब्बल २ हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तहसील कार्यालयाच्या महसूल विभागाकडे सोपवली होती. मात्र, तब्बल दोन महिने उलटूनही महसूल विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही यादी प्रणालीवर पूर्णपणे अपलोडच झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित टेबलवरील कर्मचाऱ्याने आतापर्यंत फक्त ४० टक्केच यादी अपलोड केली असून उर्वरित ६० टक्के शेतकरी अजूनही ऑनलाईन प्रणालीबाहेरच आहेत. यादी लवकरात लवकर अपलोड व्हावी यासाठी पंचायत समितीच्या कृषी विभागाचे कर्मचारी दररोज तहसीलदार कार्यालयात चकरा मारत आहेत.

परंतु, संबंधित टेबलचा कर्मचारी दररोज 'उद्या या, परवा करा' अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कर्मचाऱ्यांच्या या आडमुठी भूमिकेमुळे नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत ताटकळत राहिले आहेत. प्रशासकीय पातळीवर चाललेला हा भोंगळ कारभार अखेर चव्हाट्यावर आल्यानंतर, पंचायत समितीचे उपसभापती प्रफुल्ल बाईत यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तहसीलदार अमृता साबळे यांची भेट घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तात्काळ आणि १०० टक्के अपलोड करून त्यांना हक्काची मदत मिळवून द्यावी, असे सांगितले. आता उपसभापतींच्या हस्तक्षेपानंतर तरी महसूल विभागाचा सुस्त कारभार ताळ्यावर येणार का आणि उरलेल्या १२०० हून अधिक शेतकऱ्यांची यादी कधी अपलोड होणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital