देवरूख (प्रतिनिधी):
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या बेकायदेशीर तस्करीविरोधात संगमेश्वर पोलिसांनी एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. संगमेश्वर येथील पारेख पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या एका वॅगनर कारवर छापा टाकून पोलिसांनी तब्बल ५ लाख ४६ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीसांची चाहूल लागताच अज्ञात तस्कर कार लॉक करून फरार झाला असून, त्याच्याविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पारेख पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला एक संशयित कार उभी असून, त्यामध्ये प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा असल्याची अत्यंत गोपनीय माहिती संगमेश्वर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिनांक २६ मे २०२६ रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास पारेख पेट्रोल पंपासमोर शोधमोहीम राबवली. त्यावेळी तेथे एक वॅगनर कार (क्र. एम.एच.१४/बी.के/४१२०) लॉक केलेल्या अवस्थेत संशयास्पदरीत्या उभी असलेली पोलिसांना आढळून आली.
या गाडीमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा विक्रीच्या उद्देशाने वाहतूक केला जात होता. मात्र, अचानक गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने आणि पोलिसांच्या भीतीपोटी, पकडले जाऊ नये म्हणून अज्ञात आरोपी कार लॉक करून घटनास्थळावरून पळून गेला होता.
गाडी जप्त केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासन विभाग, रत्नागिरी कार्यालयाशी संपर्क साधला. दिनांक २७ मे २०२६ रोजी सायंकाळी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत कारची तपासणी केली असता खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:
प्रतिबंधित गुटखा व तंबाखू: केशरयुक्त विमल पान मसाला, वि.१ तंबाखू, प्रिमियम आर.एम.डी. पानमसाला आणि एम. सेंटेड टोब्याको गोल्ड (किंमत: ₹२,४६,६००)
वाहन: गुन्ह्यात वापरलेली वॅगनर कार (किंमत: ₹३,००,०००)
एकूण जप्त मुद्देमाल: ₹५,४६,६००/-
⚖️ कडक कलमांन्वये गुन्हा दाखल;* शोध युद्धपातळीवर
या धडक कारवाईप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल कृणाल चिंतामणी घोलप यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध:
भारतीय न्याय संहिता (BNS) कलम: १२३, २२३, २७४, २७५
भारतीय दंड विधान (IPC) कलम: ३२८, १८८, २७२, २७३
अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या कलम ५९ सह विविध कडक कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत असून, फरार आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

