Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाची 'तारीख पे तारीख'; न्हावेलीतील खचलेल्या साईड पट्टीबाबत ग्रामस्थ आक्रमक!

सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाची 'तारीख पे तारीख'; न्हावेलीतील खचलेल्या साईड पट्टीबाबत ग्रामस्थ आक्रमक!

न्हावेली - श्रेयस गावडे.

सावंतवाडी-माळेवाड मुख्य रस्त्यावरील न्हावेली येथे रस्त्याची साईड पट्टी खचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभाग मागील दोन वर्षांपासून पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

वारंवार पाठपुरावा करूनही केवळ 'तारीख पे तारीख' मिळत असल्याने, न्हावेलीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर यांच्यासह ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

न्हावेली येथील या मुख्य रस्त्यावरील साईड पट्टी खचल्यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. मागील दोन वर्षांपासून स्थानिक नागरिक याविषयी बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र, अधिकारी येतात, केवळ पाहणी करतात आणि निघून जातात, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. मागील महिन्यात अक्षय पार्सेकर आणि न्हावेलीतील ग्रामस्थांनी एकत्र येत सार्वजनिक बांधकाम विभागाला या समस्येबाबत निवेदन दिले होते. त्यावेळी बांधकाम उप अभियंत्यांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी, म्हणजेच १५ दिवसांच्या आत या साईड पट्टीचे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पावसाळा सुरू झाला तरी अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. अधिकारी केवळ तारखांवर तारखा देत वेळ मारून नेण्याचे काम करत आहेत.

कामाबाबत विचारणा केली असता, बांधकाम विभागाचे अधिकारी 'हे काम एका ठेकेदाराला दिले आहे, तुम्ही त्यांनाच फोन करा' असे सांगून आपली जबाबदारी झटकत आहेत. अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार उत्तरानंतर अक्षय पार्सेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 'ठेकेदाराला फोन करून कामे करून घ्यायची असतील, तर बांधकाम विभागाचे अधिकारी तिथे काय करत आहेत? शासकीय कामे करून घेणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही का?' असा रोकडा सवाल पार्सेकर यांनी उपस्थित केला आहे. पावसाळ्यामुळे खचलेल्या साईड पट्टीची स्थिती आणखी खालावली असून, येथे मोठा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. प्रशासनाच्या या दिरंगाईला कंटाळून, जर येत्या काही दिवसांत या साईड पट्टीचे काम तातडीने सुरू झाले नाही, तर रस्त्यावर उतरून तीव्र उपोषण छेडण्यात येईल, असा कडक इशारा अक्षय पार्सेकर आणि न्हावेली ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital