Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
​सावंतवाडीत मान्सूनपूर्व तयारी; मोती तलावात महसूल व पोलीस प्रशासनाला 'एनडीआरएफ'कडून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

​सावंतवाडीत मान्सूनपूर्व तयारी; मोती तलावात महसूल व पोलीस प्रशासनाला 'एनडीआरएफ'कडून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

​सावंतवाडी: गेल्या काही वर्षांतील अतिवृष्टी आणि पुराची पार्श्वभूमी लक्षात घेता, आगामी मान्सूनच्या काळात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सावंतवाडी उपविभागात प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

याचाच एक भाग म्हणून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (NDRF), पुणे यांच्या वतीने सावंतवाडी उपविभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन व रबरी बोट हाताळणीचे विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. येथील ऐतिहासिक मोती तलाव येथे हे प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पार पडले.

​बोट हाताळणीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण
पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवणे, मदत व बचाव कार्य वेगाने करणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी एनडीआरएफच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रबरी बोट (इन्फ्लेटेबल रेस्क्यू बोट) कशी फुगवावी, ती पाण्यात कशी उतरवावी, इंजिन कसे जोडावे आणि पुराच्या संकटात बोट कार्यक्षमतेने कशी चालवावी, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. तसेच, बचाव कार्यादरम्यान कोणती खबरदारी घ्यावी, याचेही सविस्तर मार्गदर्शन केले. या मोहिमेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारीही सक्रियतेने सहभागी झाले होते.

​वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती
हा महत्त्वपूर्ण उपक्रम सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आणि प्रभारी अधिकारी जिविशा विकास बडवे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

​या प्रशिक्षण शिबिराच्या वेळी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तिन्ही तालुक्यांतील उपविभागातील ग्रामविकास अधिकारी, पोलीस कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​आपत्ती व्यवस्थापन सज्जतेवर भर
ऐन पावसाळ्यात पूर किंवा दुर्घटना घडल्यास एनडीआरएफचे पथक पोहोचेपर्यंत स्थानिक पातळीवरील यंत्रणा सज्ज असणे आवश्यक असते. या प्रशिक्षणाुळे स्थानिक पोलीस, महसूल आणि ग्रामविकास यंत्रणेचे मनोबल वाढले असून, आगामी मान्सून काळात कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यास सावंतवाडी उपविभाग सज्ज असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital