Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सावंतवाडीत मुसळधार पावसामुळे तहसीलदार कार्यालयासमोरील मोठे झाड कोसळले

सावंतवाडीत मुसळधार पावसामुळे तहसीलदार कार्यालयासमोरील मोठे झाड कोसळले

व्यावसायिक सौ. भिसे यांच्या स्टॉलचे मोठे नुकसान ; सुदैवाने जीवितहानी टळली

सावंतवाडी :सावंतवाडी शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे आज, बुधवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली.

येथील तहसीलदार कार्यालयासमोरील भिसे यांच्या घरासमोर असलेले एक मोठे झाड अचानक उन्मळून पडले. हे झाड थेट सौ. भिसे यांच्या व्यावसायिक स्टॉलवर कोसळल्याने स्टॉलचे व आतील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारी सकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तहसीलदार कार्यालयासमोरील भिसे यांच्या घरासमोरील झाड अचानक मुळापासून उखडून पडले. झाड पडताना मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. हे झाड थेट सौ. भिसे यांच्या व्यावसायिक स्टॉलवर पडल्याने स्टॉलचा पूर्णपणे चक्काचूर झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. त्यानंतर संबंधित प्रशासकीय यंत्रणेला याची कल्पना देण्यात आली असून, कर्मचाऱ्यांकडून रस्त्यावरील व स्टॉलवरील झाड हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक भागांत अशीच धोकादायक झाडे उभी आहेत. त्यामुळे प्रशासनाने परिसरातील सर्व धोकादायक झाडांची तातडीने पाहणी करावी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र मागणी आता स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

याबाबत पालकमंत्री ना. नितेश राणे यांना माहिती मिळताच त्यांनी अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर तहसीलदार श्रीधर पाटील यांनी घटनास्थळी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. भिसे कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital