सावंतवाडी: सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संघाच्या वतीने अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत विशेष पाणी परीक्षण व अन्नपदार्थ परीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२६ आणि रविवार, दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सावंतवाडी नगरपालिकेच्या इंदिरा गांधी संकुलनातील पत्रकार कक्षाशेजारच्या खोलीत पार पडणार आहे.
या उपक्रमाचा लाभ तालुक्यातील सर्व व्यापारी, उद्योजक आणि व्यावसायिकांनी घ्यावा, असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे. ज्या व्यावसायिकांना पाणी व अन्नपदार्थांचे परीक्षण करून घ्यायचे आहे, त्यांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहून ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. पाणी परीक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या विशेष बॉटल्स आणि कंटेनर ज्यांना शक्य असेल, त्यांनी शिबिराच्या आदल्या दिवशी 'भारतमाता हॉटेल' येथून घेऊन जावेत.
परीक्षणासाठी सॅम्पल आणणाऱ्या व्यावसायिकांनी काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पाणी परीक्षणासाठी १ लिटरची बॉटल पूर्ण भरून आणावी आणि त्यावर 'पाणी सॅम्पल' असा स्पष्ट उल्लेख करावा. डब्यामध्ये अन्नपदार्थ किंवा ग्रेव्ही भरताना ती पूर्णपणे थंड करूनच भरावी तसेच डब्यावर त्या पदार्थाचे नाव लिहावे. यासोबत अन्नसुरक्षा परवान्याची (Food Safety License) झेरॉक्स प्रत जोडणे अनिवार्य आहे. या परवान्याच्या मागे आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि व्यवसायिकाकडे जीएसटी (G.S.T.) नंबर असल्यास तो नोंदवणे आवश्यक आहे.
तालुक्यातील सर्व व्यावसायिकांनी या अन्नसुरक्षा उपक्रमाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संघाचे अध्यक्ष श्री. जगदीश सहदेव मांजरेकर यांनी केले आहे.

