लांजा (प्रतिनिधी): लांजा शहर परिसरातील अनधिकृत टपरी खोक्या विरोधात लांजा नगरपंचायतीने कारवाईचा बडगा उगारला असून आज सोमवारी
मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्या उपस्थितीत
लांजा साटवली मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अनधिकृत खोके हटविले
अनधिकृत खोके हटविल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराने मोकळा श्वास घेतला आहे.
लांजा-साटवली मार्गालगत शाळा लांजा नंबर ५ कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या अनधिकृत खोक्यांमुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होत असल्याचे तक्रारी अर्ज नगरपंचायतीला प्राप्त झाले होते. तसेच याच मार्गावर असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडूनही अतिक्रमणाविरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या. तर या मार्गावरील रस्त्यालगत हातगाड्यांवर दुपारपासून संध्याकाळच्या वेळेस खवय्यांची मोठी गर्दी होत असे. हा मार्ग नेहमीच वर्दळीचा असून वारंवार वाहतूकीला अडथळा निर्माण होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अखेर नगरपंचायतीकडून खोके हटविण्याची कारवाई करण्यात आली.
अतिक्रमणे काढण्यात आलेल्या रस्त्यालगतच्या जागेत यापूर्वी १३ अनधिकृत खोके होते. त्यापैकी वापरात नसलेले चार खोके नगरपंचायतीने महिनाभरापूर्वीच हटविले होते. उर्वरित नऊ खोकेधारकांना नगरपंचायतीकडून जुलै महिन्यात नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही खोके कायम असल्याने २५ ऑगस्ट रोजी पुन्हा नोटीस बजावून ४८ तासांच्या मुदतीत अनधिकृत खोके हटविण्याचे निर्देश देण्यात आले होते. अखेर मुदत संपल्यानंतर सोमवारी नगरपंचायतीच्या पथकाने कारवाईला सुरुवात केली. कारवाईदरम्यान सहा खोकेधारकांनी स्वतःहून आपले खोके हटविले तर उर्वरित तीन खोके नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी हटविले.
दरम्यान, ही कारवाई सोमवारी दुपारी १२ ते ४ या कालावधीत करण्यात आली. या कारवाईवेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, प्रभारी नगरअभियंता रणवीर कोकरे-देसाई, नगररचना सहायक सुचेत बन्ने, लिपिक संजय गुरव, संतोष आगरे यांच्यासह नगरपंचायतीचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

