कारवाईची मागणी : कराडमधील उपोषणाला जाहीर पाठिंबा
सावंतवाडी । प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शासनाचे आदेश धाब्यावर बसवून बेकायदेशीर रित्या वह्या, पेन आणि इतर शैक्षणिक साहित्याची विक्री केली जात आहे.
अनुदानित आणि सीबीएससी (CBSE) मंडळाच्या शाळांकडून पालकांना साहित्य खरेदीची सक्ती केली जात असून, या शाळांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. ही कारवाई होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असा इशारा स्टेशनरी संघटनेचे राज्य कमिटी सदस्य पुरूषोत्तम कुडतरकर यांनी दिला आहे. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच कराड येथे स्टेशनरी विक्रेत्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला सिंधुदुर्ग स्टेशनरी संघटनेने पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना राज्य कमिटी सदस्य पुरुषोत्तम कुडतरकर म्हणाले की, शाळांमध्ये कोणत्याही प्रकारचा वह्या-पुस्तकांचा व्यापार चालणार नाही, असा स्पष्ट शासन आदेश आहे. खुद्द शिक्षणमंत्री आणि पालकमंत्र्यांचे आदेश असतानाही काही शाळांच्या संस्थांनी थेट दुकानेच थाटली आहेत. हा नियमांचा उघड भंग आहे. हा लढा आमच्या पोटापाण्यासाठी असून, जर या शिक्षण संस्था शिक्षणमंत्र्यांचे आदेश जुमानत नसतील, तर या लोकांवर कारवाई करणार कोण? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. या संदर्भात येत्या चार दिवसांत सिंधुदुर्ग जिल्ह्याची बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईशकुमार केसरकर यांनी जिल्हा परिषद शाळांमधील प्रकारावर तीव्र आक्षेप घेतला. काही घाटमाथ्यावरील शिक्षक जिल्हा परिषद शाळांमध्ये देखील वह्या विक्रीचा धंदा करत असून मुलांना वह्या घेण्यासाठी सक्ती केली जात आहे, असा आरोप केसरकर यांनी केला. शिक्षकांनी केवळ विद्यादानाचे काम करावे, त्यांनी धंदा करू नये. आम्ही अधिकृत विक्रेते असून सरकारला कर भरत आहोत, त्यामुळे आमच्या पोटावर पाय आणू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कराड येथील स्टेशनरी विक्रेत्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही विक्रेते तिथे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला सिंधुदुर्ग स्टेशनरी संघटनेचे अध्यक्ष साईशकुमार केसरकर, सावंतवाडी स्टेशनरी संघटना तालुकाध्यक्ष नित्यानंद कोरगावकर, राज्य कमिटी सदस्य पुरुषोत्तम कुडतरकर यांच्यासह सोहम पेडणेकर, शेखर पेडणेकर, प्रवीण आईर, सुनील केसरकर, अण्णा मठकर, संदीप सावंत, प्रसाद माधव, ऋतिक कोरगावकर, दीपक सावंत, बाळकृष्ण पेडणेकर, समीर घाडीगांवकर, नारायण नाईक आदी स्टेशनरी व्यावसायिक व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

