Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करण्याचे कृषी विद्यापीठाचे आवाहन

शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करण्याचे कृषी विद्यापीठाचे आवाहन

त्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी आगामी पाच दिवसांचा कृषी हवामान अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात १३ ते १५ जून दरम्यान तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता असून, १६ आणि १७ जून रोजी काही ठिकाणी पावसाचा जोर किंचित वाढून हलका पाऊस पडू शकतो. या कालावधीत कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ ते २७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ERFS), १७ ते २३ जून २०२६ या काळात कोकण विभागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी नियोजनात सतर्कता बाळगावी.

भात व नागली पेरणीबाबत विशेष सूचना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर, कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. पुरेसा पाऊस पडल्यानंतर आणि जमिनीत योग्य ओलावा निर्माण झाल्यानंतरच भात, नागली आणि वरी या पिकांच्या रोपवाटिकेची पेरणी गादी वाफ्यावर सुरू करावी. भात पेरणीपूर्वी बियाण्यास 'थायरम'ची (२.५ ग्रॅम प्रति किलो) बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. तसेच, घरचे बियाणे वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी ३ टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करूनच दर्जेदार बियाणे निवडावे. रोपवाटिकेतील तण नियंत्रणासाठी पेंडीमेथालिन किंवा ऑक्साडायार्जिल या तणनाशकांचा वापर वाफसा असताना करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

फळबाग आणि भाजीपाला लागवड नियोजन आंबा, काजू, नारळ आणि सुपारी यांसारख्या फळबागांच्या नवीन लागवडीसाठी ही योग्य वेळ असून, शेतकऱ्यांनी खड्डे खणून त्यात शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट आणि वाळवी नियंत्रणासाठी औषधांचे मिश्रण भरून ठेवावे. पावसाच्या सुरुवातीलाच विद्यापीठ शिफारशीत जातींची कलमे लावण्यास प्राधान्य द्यावे. तसेच काकडी, पडवळ, कारले यांसारख्या वेलवर्गीय भाजीपाल्याची लागवडही जमिनीत पुरेसा ओलावा आल्यावरच सुरू करावी. हळद लागवडीसाठी सिंचन सुविधा असल्यास प्राधान्य द्यावे आणि लागवडीपूर्वी गड्ड्यांना कीडनाशक व बुरशीनाशकाची प्रक्रिया आवर्जून करावी. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी 'मेघदूत' आणि 'दामिनी' ॲपचा वापर करावा किंवा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital