धाडसी बचावकार्यामुळे अनर्थ टळला; जखमीने मानले भावनिक आभार
राजापूर | प्रतिनिधी :राजापूर शहरातील उन्हाळे येथील श्री स्वामी समर्थ मठासमोरील मोरीवरून वेगाने वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका दुचाकीस्वाराचे प्राण प्रसंगावधान दाखवत गुरववाडी येथील वैभव गुरव आणि जगदीश गुरव या बंधूंनी धाडसी बचावकार्य करून वाचविले.
त्यांच्या या शौर्यपूर्ण कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही घटना शुक्रवारी रात्री सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. फुपेरे येथून दुचाकीवरून राजापूरकडे येत असलेले जाधव (वय ४२) हे मोरीवरून वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे दुचाकीचा तोल जाऊन ते मोरीत अडकले. पुराच्या पाण्याने दुचाकी काही अंतर वाहत गेली आणि जाधव एका छोट्या झाडाला धरून जीवाच्या आकांताने मदतीसाठी हाका मारू लागले.
याच वेळी मुंबई-गोवा महामार्गावरील रेल्वे फाटकाच्या दिशेने जात असलेले वैभव गुरव आणि त्यांचे बंधू जगदीश गुरव यांनी मोरीजवळ पडलेली दुचाकी पाहून काहीतरी गंभीर घडल्याचा संशय घेतला. त्यांनी तत्काळ वाहन थांबवून परिसरात शोध घेतला. त्यावेळी पुराच्या पाण्यात झाडाला धरून उभे असलेले जाधव त्यांना दिसले.
बचावासाठी कोणतेही साहित्य उपलब्ध नसतानाही दोन्ही भावांनी धाडस न सोडता झाडांच्या वेलीचा दोर तयार केला. त्याच्या साहाय्याने त्यांनी जाधव यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना सुखरूप बाहेर काढले. या धाडसी बचावकार्यात दोन्ही बंधू पूर्णपणे भिजले, मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत एक जीव वाचविण्यात यश मिळविले.
जीव वाचल्यानंतर भावूक झालेल्या जाधव यांनी गुरव बंधूंना मिठी मारून कृतज्ञता व्यक्त केली. 'आज तुम्ही वेळेवर आला नसता, तर मी जिवंत दिसलो नसतो,' अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली.
दरम्यान, या घटनेच्या निमित्ताने पावसाळ्यात पूल, मोरी किंवा रस्त्यावरून पाणी वाहत असताना त्यातून वाहन नेण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासन आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. गुरव बंधूंच्या धाडसी आणि माणुसकी जपणाऱ्या कृतीचे राजापूर परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.

