Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सीएनजी ट्रकच्या धडकेत फांदी रिक्षावर कोसळली; मोठा अनर्थ टळला

सीएनजी ट्रकच्या धडकेत फांदी रिक्षावर कोसळली; मोठा अनर्थ टळला

खेड : प्रतिनिधी खेड शहरातील तीन पत्ती नाका परिसरात शुक्रवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकची रस्त्यालगत असलेल्या झाडाला धडक बसल्याने झाडाची मोठी फांदी तुटून एका रिक्षावर कोसळली.

सुदैवाने रिक्षामध्ये कोणताही प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या अपघातात रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
खेड-दापोली मार्गाच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू असल्याने तीन पत्ती नाका परिसरात एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. खेडहून दापोलीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी नगरपरिषदेसमोरील नव्या रस्त्याचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले असून, दापोलीहून खेडकडे येणाऱ्या वाहनांसाठी खांबतळे परिसरातून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र अनेक लहान वाहनचालक व रिक्षाचालक या वाहतूक व्यवस्थेचे पालन न करता एकाच मार्गाचा वापर करत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, शुक्रवारी रात्री खेडहून दापोलीच्या दिशेने जात असलेल्या सीएनजी ट्रकची झाडाला धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी होती की झाडाची मोठी फांदी तुटून जवळील रिक्षावर कोसळली. अपघाताच्या वेळी रिक्षामध्ये कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. अन्यथा गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
घटनेची माहिती मिळताच नगरसेवक स्वप्निल सैतवडेकर आणि कौशल जाडकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यांच्या पुढाकाराने रिक्षावर पडलेली फांदी हटविण्यात आली तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.
या अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. मात्र स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या मदतीने परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली. सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital