Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सिंधुदुर्गच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी !

सिंधुदुर्गच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी !

मित कदम चे यश — भारत देशाची शान! फोंडाघाट चा अभिमान !

मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत रौप्य व कांस्यपदकाची दुहेरी कमाई—

फोंडाघाट (कुमार नाडकर्णी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द गावचे सुपुत्र तसेच फ्युचर फिट जिम, फोंडाघाटचे संस्थापक व मालक अमित कदम यांनी थायलंडची राजधानी बँकॉक येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित मिस्टर युनिव्हर्स बॉडीबिल्डिंग स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.

या स्पर्धेत अमित कदम यांनी बॉडीबिल्डिंग प्रकारात रौप्यपदक (Silver Medal) पटकावले, तर क्लासिक फिजिक प्रकारात कांस्यपदक (Bronze Medal) जिंकून दुहेरी यश संपादन केले. जगातील विविध देशांतील अव्वल स्पर्धकांच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेत त्यांनी आपल्या उत्कृष्ट शरीरयष्टी, अथक परिश्रम, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि जिद्दीच्या बळावर हे यश मिळवले.

अमित कदम हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिटनेस आणि बॉडीबिल्डिंग क्षेत्रात एक परिचित नाव असून, त्यांनी फोंडाघाट येथे फ्युचर फिट जिमची स्थापना करून अनेक युवकांना फिटनेस आणि क्रीडा क्षेत्रात प्रेरणा दिली आहे. स्वतःच्या कठोर मेहनतीच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.

मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेतील या यशामुळे हरकुळ खुर्द गाव, कणकवली तालुका आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गौरव वाढला आहे. त्यांच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, क्रीडाप्रेमी, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यावेळी बोलताना अमित कदम म्हणाले, 'मिस्टर युनिव्हर्ससारख्या जागतिक दर्जाच्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून दोन पदके जिंकणे हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. हे यश माझ्या कुटुंबीयांना, गुरुजनांना, फ्युचर फिट जिमच्या सर्व सदस्यांना आणि मला सातत्याने पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समर्पित आहे. भविष्यात भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे माझे ध्येय आहे.'

अमित कदम यांच्या या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांमध्ये फिटनेस, बॉडीबिल्डिंग आणि निरोगी जीवनशैलीबाबत नवीन प्रेरणा निर्माण झाली असून त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital