शाहूपुरी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी…
प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर : प्रवासादरम्यान चोरीला गेलेले जवळपास ८ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि महागडे घड्याळ अवघ्या काही दिवसात शोधून काढत शाहूपुरी पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या कौशल्याची चमक दाखवून दिली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमधील एका संशयास्पद हालचालींच्या धाग्यावरून पोलिसांनी थेट ठाणे जिल्ह्यातील आरोपीला अटक करत संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला.
ताराबाई पार्क येथील ऋषीकुमार राजपूत हे मुंबईतील मुलुंड येथून कोल्हापूरकडे येत असताना त्यांच्या ताब्यातील सोन्याच्या तीन अंगठ्या, गळ्यातील चैन, हातातील ब्रेसलेट, सोन्याचे नाणे, रोख रक्कम १२ हजार रुपये आणि स्कॅगन कंपनीचे घड्याळ असा एकूण ७ लाख ९७ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक संतोष डोके यांचा माग सुनाखाली पुण्यश्लोक पथकाने तपासणीसाठी हवेत आणि फिरवली चालक घेतल्याची माहिती दिल्यानंतर तपासाचे सूत्र त्या तालपाकडे वळले
दरम्यान खोपोली आणि सातारा येथील सीसीटीव्ही फुटेज तपासताना पोलिसांच्या नजरेस एक महत्त्वाचा तपशील हाती पडला. फिर्यादी जेवण्यासाठी खाली उतरले असताना चालकाने गाडी पार्किंगमध्ये न लावता मागील बाजूस नेऊन डिक्की उघडून संशयास्पद हालचाली केल्याचे दिसून आले. याच एका धाग्यावरून संशयित चालकाचा शोध सुरू केला.
तांत्रिक विश्लेषण आणि तपासाच्या बळावर पोलिसांनी आरोपी मोहन आनंदराव आडागळे (वय ६२,रा. सरगुरु नगर, दिवा, जि.ठाणे) याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेल्या सर्व सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि घड्याळ असा ७ लाख ९७ हजार रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.त्यामुळे फिर्यादीला मोठा दिलासा मिळाला आहे.
या धडाकेबाज कारवाईत पोलीस अधीक्षक निलोत्पल,अप्पर पोलीस अधीक्षक आप्पासाहेब जाधव,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव,पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर करीत आहेत.
आरोपी-मोहन आनंदराव आडागळे

