शहरात ठिकठिकाणी आधुनिक कचरा पेट्या कार्यान्वित
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
शहरात पूर्वीच्या कचरा कुंड्या हटवल्यानंतर अनेक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार वाढले होते. या समस्येवर मात करण्यासाठी आणि शहर स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्या संकल्पनेतून शहरात विविध ठिकाणी आधुनिक कचरा पेट्या (डस्टबीन्स) बसवण्यात आल्या आहेत. नगराध्यक्षांच्या विशेष पुढाकारातून प्रशासनाने हा उपक्रम तातडीने राबवला आहे.
ओला आणि सुका कचरा वर्गीकरण सोपे
शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावताना वर्गीकरण करणे सोपे जावे, यासाठी या आधुनिक कचरा पेट्यांची रचना करण्यात आली आहे. यात ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये टाकण्याची सोय करण्यात आली आहे. नागरिकांनी कचरा टाकतानाच त्याचे वर्गीकरण करावे, जेणेकरून कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येईल, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
भटक्या प्राण्यांच्या त्रासापासून सुटका; वैशिष्ट्यपूर्ण रचना
पूर्वी शहरात उघड्या कचरा कुंड्या असल्यामुळे भटक्या कुत्र्यांकडून कचरा विस्कटला जायचा. यामुळे परिसरात दुर्गंधी सुटायची आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत होता. ही बाब लक्षात घेऊन या आधुनिक कचरा पेट्यांची रचना अतिशय चांगल्या शक्कलेने आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने करण्यात आली आहे. नवीन रचनेमुळे भटक्या कुत्र्यांना कचरा पेट्या उपसणे किंवा कचरा बाहेर काढणे शक्य होणार नाही.
शहरातील उघड्यावरील कचऱ्याची समस्या मिटवण्यासाठी आणि सावंतवाडीचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी नगरपरिषदेने उचललेले हे पाऊल अतिशय स्तुत्य मानले जात आहे. या उपक्रमामुळे शहर स्वच्छतेला मोठा हातभार लागणार असून, नागरिकांनीही या आधुनिक कचरा पेट्यांचा योग्य वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.

