Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तळवडेच्या श्री जनता विद्यालयाच्या मुलींची तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत बाजी

तळवडेच्या श्री जनता विद्यालयाच्या मुलींची तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत बाजी

दोन्ही संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
​महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालय आणि सावंतवाडी तालुका व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेत श्री जनता विद्यालय तळवडेच्या मुलींनी चमकदार कामगिरी करत दुहेरी यश संपादन केले आहे.

विद्यालयाच्या १४ आणि १७ वर्षांखालील दोन्ही मुलींच्या संघांनी अंतिम सामन्यात विजय मिळवून प्रथम क्रमांक पटकावला असून, जिल्हास्तरीय स्पर्धेत सावंतवाडी तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे.

​१४ वर्षांखालील मुलींची स्पर्धा १२ सप्टेंबर रोजी कळसूळकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे पार पडली. या स्पर्धेत तळवडेच्या मुलींनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपद मिळवले. या विजयी संघात आराध्या तळवडेकर, समृद्धी आचरेकर, रुद्रा चौगुले, दिशा गावडे, खुशी नाईक, कीर्ती पेडणेकर, काव्या अमरे, इंद्रायणी रेडकर, आर्या नाईक, आरोही शिरोडकर आणि स्वरा सातार्डेकर यांचा समावेश होता.

​त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी श्री जनता विद्यालय तळवडे येथे आयोजित १७ वर्षांखालील गटाच्या स्पर्धेतही विद्यालयाच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन सुरूच ठेवले. स्थानिक मैदानावर खेळताना मुलींच्या संघाने दणदणीत विजय मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. या संघात आर्या पावणोजी, आरुषी सावंत, अनुष्का कुंभार, साक्षी पेडणेकर, श्रुती जाधव, श्रावणी दळवी, वैष्णवी जाधव, मालविका गावडे, आर्या मांजरेकर, सानवी पावणोजी, शमिका परब व आर्या सावंत या खेळाडूंचा सहभाग होता.

​विद्यार्थिनींच्या या दैदिप्यमान यशामागे विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक दयानंद बांगर, विजय सोनवणे आणि शांताराम गवई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. दोन्ही वयोगटातील संघांनी मिळवलेल्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी खेळाडूंचे मनापासून अभिनंदन केले असून, आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेतील कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital