Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तिलारी घाटात महिलेचा सडलेला मृतदेह आढळल्याने खळबळ; घातपाताचा संशय

तिलारी घाटात महिलेचा सडलेला मृतदेह आढळल्याने खळबळ; घातपाताचा संशय

दोडामार्ग / चंदगड : तिलारी घाट परिसरात एका अज्ञात महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह शुक्रवारी (ता. २९) आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह अत्यंत निर्जन स्थळी सापडल्याने घातपाताची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत असून चंदगड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी तिलारी घाटातून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना आणि नागरिकांना परिसरात तीव्र दुर्गंधी जाणवली. संशय आल्याने त्यांनी याची माहिती तात्काळ चंदगड पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी केली असता, घाटातील निर्जन भागात अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील एका महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला.
​ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान
मृत महिलेच्या अंगावर काळ्या रंगाची साडी आणि तपकिरी रंगाचा ब्लाऊज असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या महिलेचा मृत्यू होऊन सुमारे आठ ते दहा दिवस उलटून गेले असावेत. मृतदेह अत्यंत कुजलेल्या आणि सडलेल्या अवस्थेत असल्याने सदर महिलेची ओळख पटविणे सध्या पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.
​घातपाताचा संशय, पोलिसांचा तपास सुरू
हा मृतदेह ज्या ठिकाणी आढळून आला, तो परिसर अत्यंत निर्जन आहे. त्यामुळे या महिलेचा खून करून मृतदेह घाटात आणून टाकला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चंदगड पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला आहे.
​सदर महिला नेमकी कुठली आहे? तिची ओळख काय? आणि तिच्या मृत्यूमागील नेमके कारण काय? याचा शोध घेण्यासाठी चंदगड पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे तिलारी घाट परिसरात भीतीचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital