खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील वेरळ शाखा पोस्ट कार्यालयाचे पोस्टमास्तर रियाज खलील तडवी यांनी टपाल विभागाच्या 'टॉप अचिव्हमेंट इन नॅशनल बिल पे (PLI/RPLI)' या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्तरावर मानाचा पुरस्कार पटकावला.
उत्तर रत्नागिरीसाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र चिपळूण डाक विभागाच्या लोकार्पण सोहळ्यात त्यांना पदक, प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
गोवा पणजी परिक्षेत्राचे पोस्टल सेवा संचालक रमेश पांडुरंग पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोस्टल सेवा संचालक एस. जी. खडगावकर, रत्नागिरी डाक विभागाचे अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सपकाळ, नगरसेविका रसिका देवळेकर, प्रयास फाउंडेशनच्या अध्यक्षा रवीना गुजर यांच्यासह टपाल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रियाज तडवी यांनी वेरळ शाखा पोस्ट कार्यालयामार्फत पोस्टल लाईफ इन्शुरन्स (PLI/RPLI) आणि नॅशनल बिल पे सेवांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत ग्राहकांना प्रभावी सेवा दिली. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत टपाल विभागाने त्यांचा विभागीय स्तरावरील पुरस्काराने गौरव केला. ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या पोस्टमास्तराने केलेल्या या उल्लेखनीय यशामुळे खेड तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
याच कार्यक्रमात उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, खेड, दापोली, गुहागर आणि मंडणगड या पाच तालुक्यांसाठी स्वतंत्र चिपळूण डाक विभागाचे लोकार्पणही करण्यात आले. नागरिकांना अधिक जलद, अचूक आणि सुलभ टपाल सेवा देण्याच्या उद्देशाने हा विभाग सुरू करण्यात आला असून, या सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे खेड तालुक्यातील तब्बल सात कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी गौरविण्यात आले.
रियाज खलील तडवी यांच्या या यशामुळे ग्रामीण डाक सेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

